आजच्याच दिवशी सचिनने केला होता कोणालाही न जमलेला पराक्रम, ठरला होता पहिलाच फलंदाज

आजच्याच दिवशी सचिनने केला होता कोणालाही न जमलेला पराक्रम, ठरला होता पहिलाच फलंदाज

सचिन तेंडुलकर हा भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील एक दिग्गज फलंदाज आहे. तसेच २४ फेब्रुवारी हा दिवस सचिन तेंडुलकरच्या चाहत्यांसाठी अत्यंत खास आहे. याच दिवशी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने कोणालाही न जमलेला पराक्रम करत इतिहास रचला होता. त्याने २४ फेब्रुवारी २०१० रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या वनडे सामन्यात पहिले वहिले दुहेरी शतक झळकावले होते.

भारतीय संघाने १५३ धावांनी मिळवला होता विजय..

एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने या सामन्यात १५३ धावांनी विजय मिळवला होता. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाला ३ गडी बाद ४०१ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका संघाकडून एबी डिविलियर्सने नाबाद ११४ धावांची खेळी केली होती. परंतु ही खेळी व्यर्थ गेली होती. कारण यजमान दक्षिण आफ्रिका संघाचा संपूर्ण डाव ४२.५ षटकात अवघ्या २४८ धावांवर संपुष्टात आला होता.

असा कारनामा करणारा सचिन तेंडुलकर ठरला होता एकमेव फलंदाज 

सचिन तेंडुलकरने या सामन्यात वैयक्तिक २०० धावांचा पल्ला ओलांडल्यानंतर स्टेडियममध्ये जल्लोषाचे वातावरण होते. कारण यापूर्वी वनडे क्रिकेटच्या इतिहासात कुठल्याही फलंदाजाला असा कारनामा करता आला नव्हता. सचिनने या डावात १४७ चेंडूंचा सामना करत नाबाद २०० धावांची खेळी केली होती. या खेळी दरम्यान त्याने २५ चौकार आणि ३ षटकार मारले होते.

 हा सामना झाल्यानंतर सचिन तेंडुलकर म्हणाला होता की, "मी हे दुहेरी शतक सर्व भारतीयांना समर्पित करतो. जे गेल्या २० वर्षांपासून प्रत्येक चढ-उतारात माझ्या पाठीशी उभे राहिले आहेत. जेव्हा मी २०० धावांच्या जवळ पोहोचलो त्यावेळी मला वाटले की, मी दुहेरी शतक करू शकतो."

टॅग्स:

sachin tendulkar

संबंधित लेख