भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये नुकताच दोन कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील दोन्ही सामन्यात भारतीय संघातील खेळाडूंचा दबदबा पाहायला मिळाला. मोहालीच्या मैदानावर विजय मिळवल्यानंतर बंगलोरच्या मैदानावर पार पडलेल्या डे नाईट कसोटी सामन्यात देखील भारतीय संघातील खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी करत २३८ धावांनी विजय मिळवला. या मालिकेदरम्यान अनेक मोठ मोठे विक्रम देखील झाले आहेत. या लेखातून आम्ही तुम्हाला या मालिकेत झालेल्या १० विक्रमांबद्दल अधिक माहिती देणार आहोत.
१) टी-२० मालिकेनंतर कसोटी मालिकेत देखील भारतीय संघाने श्रीलंका संघाला क्लीन स्वीप केले आहे. यासह सलग दुसऱ्यांदा भारतीय संघाने २ संघांना २ मालिकेत क्लीन स्वीप करण्याचा पराक्रम केला आहे. तसेच तब्बल २८ वर्षानंतर पहिल्यांदाच भारतीय संघाने श्रीलंका संघाला क्लीन स्वीप केले आहे.
२) तसेच धनंजय डी सिल्वाला बाद करताच आर अश्विन कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा ८वा गोलंदाज बनला आहे. त्याने डेल स्टेनचा विक्रम मोडून काढला आहे. दक्षिण आफ्रिका संघाचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेनने ४३९ गडी बाद केले होते. तर आर अश्विनने ४४० गडी बाद केले आहेत.
३) तसेच श्रीलंका संघाविरुद्ध मिळवलेला विजय हा खूप खास आहे. कारण हा मायदेशात भारतीय संघाचा सलग १५ वा विजय आहे.
४) तसेच श्रीलंका संघातील फलंदाज दिमूथ करुणारत्नेने चौथ्या डावात १००० धावा पूर्ण केल्या आहेत. असा कारनामा करणारा तो श्रीलंकेचा तिसरा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी कुमार संगकारा (११६३ ) आणि महेला जयवर्धनेने (१०९६) असा कारनामा केला होता.
५) लहिरू थिरमने कसोटी क्रिकेटमध्ये ११ व्या वेळी शून्यावर बाद झाला आहे.
६) रिषभ पंत कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी सर्वात वेगवान अर्धशतक झळकावणारा फलंदाज ठरला आहे. त्याने या कसोटी सामन्यात अवघ्या २८ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले. यापूर्वी हा विक्रम माजी भारतीय कर्णधार कपिल देव यांचा नावावर होता. कपिल देव यांनी ३० चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले होत.
७) गेल्या ७३ डावात विराट कोहलीला एकही शतक झळकावता आले नाहीये.
८) पहिल्या डावात २ गडी बाद करताच आर अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६५० गडी बाद करण्याचा पराक्रम केला आहे. क्रिकेटच्या तीनही स्वरूपात ६५० गडी बाद करणारा आर अश्विन चौथा भारतीय गोलंदाज ठरला आहे. आर अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये ४३९, वनडे क्रिकेटमध्ये १५१ आणि टी२० क्रिकेटमध्ये ६१ गडी बाद केले आहेत.
९) जसप्रीत बुमराहने ८ वेळेस कसोटी क्रिकेटच्या एका डावात ५ किंवा त्यापेक्षा अधिक गडी बाद केले आहेत.
१०) तसेच जसप्रीत बुमराहने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३०० गडी बाद करण्याचा पराक्रम केला आहे. असा पराक्रम करणारा तो १२ वा भारतीय गोलंदाज ठरला आहे.
