येत्या २७ ऑगस्ट पासून आशिया चषक २०२२ (Asia Cup 2022) स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. तसेच २८ ऑगस्ट रोजी कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) संघ आमने सामने येणार आहेत. हे दोन्ही संघ जेव्हा आमने सामने येत असतात,त्यावेळी क्रिकेट चाहत्यांना हाय व्होल्टेज सामना पहायला मिळत असतो. आयसीसी टी -२० विश्वचषक २०२२ (Icc T-20 world cup) स्पर्धेत भारतीय संघाला पाकिस्तान संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे भारतीय संघाकडे पाकिस्तान संघाला पराभूत करून पराभवाची परतफेड करण्याची संधी असणार आहे. भारतीय संघात असे ३ खेळाडू आहेत, जे पाकिस्तान संघासाठी धोक्याची घंटा ठरू शकतात. कोण आहेत ते ३ खेळाडू? चला पाहूया.
विराट कोहली (Virat Kohli):
भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीला वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे दौऱ्यावर विश्रांती देण्यात आली आहे. तो थेट आशिया चषक २०२२ स्पर्धेत पाकिस्तान विरुध्द होणाऱ्या सामन्यातून पुनरागमन करणार आहे. पाकिस्तान विरुध्द होणारा सामना हा विराट कोहलीसाठी अतिशय खास असणार आहे. कारण हा त्याच्या टी -२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील १०० वा सामना असणार आहे. विराट कोहलीच्या फलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने पाकिस्तान संघाविरुद्ध फलंदाजी करताना धावांचा पाऊस पाडला आहे. जेव्हा जेव्हा पाकिस्तान संघाविरुद्ध सामना होतो, त्या सामन्यात विराट कोहली पाकिस्तान संघातील गोलंदाजांची चांगलीच धुलाई करत असतो.
हार्दिक पंड्या (Hardik pandya) :
भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या देखील संघातील प्रमुख खेळाडूंपैकी एक आहे. हार्दिक पंड्या देखील पाकिस्तानी गोलंदाजांची चांगलीच धुलाई करतो. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत जेव्हा भारतीय संघातील प्रमुख फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले होते, त्यावेळी हार्दिक पंड्या एकटा शेवटपर्यंत टिकून होता. त्याने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत पाकिस्तानी गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला होता. फलंदाजीसह तो गोलंदाजी करताना देखील पाकिस्तानी फलंदाजांना अडचणीत टाकत असतो.
भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar):
भुवनेश्वर कुमारला देखील आशिया चषक २०२२ स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. भुवनेश्वर कुमारकडे टी -२० क्रिकेट खेळण्याचा दांडगा अनुभव आहे. हा अनुभव भारतीय संघाच्या कामी येऊ शकतो. स्विंग किंग म्हणून ओळखल्या जाणारा भुवनेश्वर कुमार नव्या चेंडूने गोलंदाजी करताना गडी बाद करून देऊ शकतो. त्याने आतापर्यंत पाकिस्तान संघाविरुद्ध एकूण ४ टी -२० सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने ७.२१ च्या इकॉनॉमिने ५ गडी बाद केले आहेत. त्यामुळे तो पाकिस्तान संघाविरुद्ध मोलाची भूमिका बजावू शकतो.
काय वाटतं? पाकिस्तान विरुद्ध होणाऱ्या सामन्यात विराट कोहली मोठी खेळी करेल का? कमेंट करून नक्की कळवा.
