आयसीसी टी -२० विश्वचषक २०२२ स्पर्धेला जोरदार प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेत भारतीय संघाचा पहिला सामना २३ ऑक्टोबर रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाविरुद्ध पार पडणार आहे. हा सामना पाहण्यासाठी दोन्ही देशातील प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे. टी -२० विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात हे दोन्ही संघ ६ वेळेस आमने सामने आले आहेत. यादरम्यान भारतीय संघाने ५ वेळेस बाजी मारली आहे. तर केवळ १ वेळेस पाकिस्तान संघाला विजय मिळवता आला आहे.
गतवर्षी झालेल्या सामन्यात पाकिस्तान संघाने भारतीय संघावर १० गडी राखून विजय मिळवला होता. त्यामुळे यावेळी भारतीय संघ पराभवाची परतफेड करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. दोन्ही संघांमध्ये एकापेक्षा एक उत्कृष्ट खेळाडू आहेत. तसेच या सामन्यात प्लेअर बॅटल देखील पाहायला मिळू शकते. चला तर पाहूया भारत - पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामन्यातील टॉप -३ प्लेअर बॅटल.
१) रोहित शर्मा आणि शाहीन आफ्रिदी..
भारतीय संघाचा कर्णधार आणि पाकिस्तान संघाचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी यांच्यात डावाच्या सुरुवातीला जोरदार स्पर्धा पाहायला मिळू शकते. टी -२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत जेव्हा हे दोघे आमने सामने आले होते. त्यावेळी शाहीन आफ्रिदीने बाजी मारली होती. त्याने रोहित शर्माला पहिल्याच चेंडूवर पायचीत करत माघारी धाडले होते. शाहीन आफ्रिदीने आतापर्यंत एकूण ३८ टी -२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने ४७ गडी बाद केले आहेत. तर रोहित शर्माने १३९ सामन्यांमध्ये ३०.३ च्या सरासरीने ३६८१ धावा केल्या आहेत.
२) भुवनेश्वर कुमार आणि बाबर आझम..
भारतीय संघातील अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत वेगवान गोलंदाजी आक्रमणाचे नेतृत्व करताना दिसून येऊ शकतो. पाकिस्तान संघाला डावाच्या सुरुवातीला भुवनेश्वर कुमारच्या धारदार आणि स्विंग होणाऱ्या चेंडूंचा सामना करावा लागेल. बाबरने आतापर्यंत ८७ टी-२० सामन्यांमध्ये ४२.९ च्या सरासरीने ३१७२ धावा केल्या आहेत. तर भुवीने ७५ सामन्यांमध्ये ८१ फलंदाजांना माघारी पाठवले आहे.
३) विराट कोहली आणि नसीम शाह..
या हाय व्होल्टेज सामन्यात भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली आणि पाकिस्तानचा युवा गोलंदाज नसीम शाह यांच्यात देखील रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो. अनुभवाच्या बाबतीत दोन्ही खेळाडूंची तुलना केली जाऊ शकत नाही. मात्र मैदानावर दोन्ही खेळाडूंमध्ये स्पर्धा पाहायला मिळू शकते. नसीमने आतापर्यंत ९ टी -२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने ११ गडी बाद केले आहेत. तर विराट कोहलीने १०५ सामन्यांमध्ये ५१.४ च्या सरासरीने ३७०१ धावा केल्या आहेत.
काय वाटतं? भारत - पाकिस्तान सामन्यात कोणता संघ मारणार बाजी? कमेंट करून नक्की कळवा..
