आयपीएलच्या लिलावात हे परदेशी गोलंदाज होऊ शकतात मालामाल, पाहा संपूर्ण यादी..

आयपीएलच्या लिलावात हे परदेशी गोलंदाज होऊ शकतात मालामाल, पाहा संपूर्ण यादी..

आयपीएल २०२३ स्पर्धेची तयारी सुरू झाली आहे. येत्या २३ डिसेंबर रोजी या स्पर्धेसाठीची लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. या लिलावात एकूण ४०४ खेळाडूंवर बोली लावण्यात येणार आहे. काही संघ आपल्या संघात उत्तम फलंदाजांची भर घालण्याच्या प्रयत्नात असतील. तर काही संघ अनुभवी गोलंदाजांना आपल्या संघात स्थान देण्यासाठी प्रयत्नशील असतील. दरम्यान बोभाटाच्या या लेखात आम्ही तुम्हाला अशा ५ गोलंदाजांबद्दल माहिती देणार आहोत, जे या लिलावात मालामाल होऊ शकतात.

ख्रिस जॉर्डन :ख्रिस जॉर्डन हा इंग्लंड संघातील महत्वपूर्ण खेळाडूंपैकी एक आहे. हा गोलंदाज शेवटच्या षटकांमध्ये येऊन इंग्लंड संघासाठी मोलाची भूमिका बजावत असतो. टी -२० क्रिकेटचा दांडगा अनुभव असणाऱ्या या खेळाडूने आतापर्यंत एकूण २९५ टी -२० सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने ३१० गडी बाद केले आहेत.  त्याची गोलंदाजी करण्याची क्षमता पाहून नक्कीच त्याच्यावर मोठी बोली लागू शकते.

केन रिचर्डसन :आयपीएल स्पर्धेत देखील ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा दबदबा पाहायला मिळाला आहे. यामध्ये आणखी एका गोलंदाजाची भर पडू शकते. जगभरातील टी -२० स्पर्धांमध्ये आपल्या गोलंदाजीने फलंदाजांना अडचणीत टाकणाऱ्या केन रिचर्डसनवर मोठी बोली लागू शकते. केन रिचर्डसनने आतापर्यंत एकूण १५४ टी -२० सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने २०० गडी बाद केले आहेत.

ॲडम झांपा:भारतीय खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना किती मदत मिळते हे काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाहीये. त्यात गोलंदाज जर ॲडम झांपा सारखा  असेल तर आणखीच सरस. कारण या गोलंदाजाने आपल्या फिरकीच्या जाळ्यात अनेक दिग्गज फलंदाजांना अडकवले आहे. त्यामुळे अनेक फ्रँचायझींमध्ये या खेळाडूला खरेदी करण्यासाठी चुरस पाहायला मिळू शकते. या गोलंदाजाने आतापर्यंत एकूण ७२ टी -२० सामन्यांमध्ये एकूण ८२ गडी बाद केले आहेत.

दुष्मंता चमीरा :श्रीलंका संघातील वेगवान गोलंदाज दुष्मंता चमीरा हा सध्या टी -२० क्रिकेटमध्ये चर्चेचा विषय ठरतोय. या वेगवान गोलंदाजाने आतापर्यंत एकूण ५२ गडी बाद केले आहेत. हा असा गोलंदाज आहे जो कुठल्याही क्षणी गोलंदाजीला येऊन सामना जिंकवून देऊ शकतो. त्यामुळे दुष्मंता चमीरा देखील या लिलावात महागडा गोलंदाज ठरू शकतो. 

जोशूआ लिटिल :आयर्लंडच्या या गोलंदाजाने टी -२० विश्वचषक जोरदार कामगिरी केली होती. मुख्यतः डेथ ओव्हर्समध्ये हा गोलंदाज फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरला होता. या गोलंदाजाने आपल्या कारकीर्दीत एकूण २६ टी -२० सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने एकूण ३९ गडी बाद केले आहेत.

काय वाटतं आगामी आयपीएल लिलावात कुठल्या गोलंदाजावर सर्वाधिक बोली लागू शकते? कमेंट करून नक्की कळवा.