आयपीएल २०२३ स्पर्धेसाठीचा लिलाव सोहळा येत्या २३ डिसेंबर रोजी कोची येथे पार पडणार आहे. या लिलावात ८७ जागा भरून काढण्यासाठी एकूण ४०४ खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे. त्यामुळे खेळाडूंवर पैशांचा वर्षाव होणार यात काहीच शंका नाही. मात्र यावेळी आयपीएलच्या लिलावात सर्वात महगडा खेळाडू कोण ठरणार? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा ५ खेळाडूंबद्दल माहिती देणार आहोत, जे या लिलावात महागडे खेळाडू ठरू शकतात.
बेन स्टोक्स :
बेन स्टोक्स हा असा खेळाडू आहे ज्याला प्रत्येक संघ आपल्या संघात स्थान देण्यासाठी कसून प्रयत्न करताना दिसून येऊ शकतो. कारण फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये देखील हा खेळाडू विरोधी संघाचा चांगलाच घाम काढू शकतो. तो एक उत्तम अष्टपैलू खेळाडू असून नेतृत्व करण्यासाठी देखील उत्तम पर्याय आहे. त्यामुळे यावेळी आयपीएल स्पर्धेसाठी होणाऱ्या लिलावात बेन स्टोक्स सर्वात महागडा खेळाडू ठरू शकतो.
कॅमरन ग्रीन :
ऑस्ट्रेलिया संघाचा अष्टपैलू खेळाडू कॅमरन ग्रीन हा देखील चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. त्याची गोलंदाजी आणि फलंदाजी करण्याची क्षमता पाहून संघांमध्ये त्याला खरेदी करण्यासाठी चुरस पाहायला मिळू शकते. आगामी आयपीएल लिलावात त्याची मूळ किंमत २ कोटी रुपये इतकी असणार आहे.
सॅम करन:
वेगवान गोलंदाजी करणाऱ्या अष्टपैलू खेळाडूच्या शोधात असणाऱ्या संघासाठी सॅम करन हा प्रमुख खेळाडू ठरू शकतो. कारण आयसीसी टी -२० विश्वचषक २०२२ स्पर्धेत या खेळाडूने प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार पटकावला होता. तसेच आयपीएल स्पर्धेत देखील या खेळाडूचा रेकॉर्ड जबरदस्त आहे. त्यामुळे लिलावात सॅम करनचं नाव येताच सर्व संघ त्याला आपल्या संघात स्थान देण्यासाठी पैशांचा पाऊस पाडताना दिसून येऊ शकतात.
सिंकदर रजा :
झिम्बाब्वे संघातील अष्टपैलू खेळाडू सिकंदर रजा हा मैदानावर आल्यावर काय करू शकतो, हे त्याने आयसीसी टी -२० विश्वचषक स्पर्धेत दाखवून दिले होते. फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये त्याने जोरदार कामगिरी केली होती. त्यामुळे आगामी आयपीएल लिलावात त्याच्यावर मोठी बोली लागू शकते.
नारायण जगदीशन:
चेन्नई सुपर किंग्ज संघाने रिलीज केलेला खेळाडू नारायण जगदीशन सध्या जोरदार फॉर्ममध्ये आहे. त्याने विजय हजारे ट्रॉफी २०२२ स्पर्धेत ८१० धावा ठोकल्या आहेत. त्याची अप्रतिम फलंदाजी पाहता त्याच्यावर मोठी बोली लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
काय वाटतं? या ५ खेळाडूंपैकी कुठल्या खेळाडूवर सर्वात मोठी बोली लागू शकते? कमेंट करून नक्की कळवा.




