आयपीएल २०२३ स्पर्धेसाठी झालेल्या मिनी ऑक्शनमध्ये परदेशी खेळाडूंचा बोलबाला पाहायला मिळाला. लिलाव सुरु होण्यापूर्वीच अंदाज व्यक्त केला गेला होता की, सॅम करन आणि बेन स्टोक्स सारख्या खेळाडूंवर मोठी बोली लागणार. मात्र हॅरी ब्रूक्स हा सरप्राईझ पॅकेज ठरला. सनरायझर्स हैदराबाद संघाने त्याच्यावर १३.२५ कोटींची बोली लावली. या ऑक्शनमध्ये भारतीय खेळाडूंपेक्षा परदेशी खेळाडूंवर सर्वाधिक बोली लावली गेली. बोभाटाच्या या लेखात आम्ही तुम्हाला ५ अशा खेळाडूंबद्दल माहिती देणार आहोत ज्यांच्यावर मिनी ऑक्शनमध्ये १० कोटींपेक्षा अधिकची बोली लावली गेली.
हॅरी ब्रुक : इंग्लंड संघातील खेळाडू हॅरी ब्रुक याला सनरायझर्स हैदराबाद संघाने १३.२५ कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले आहे. राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या दोन्ही संघांमध्ये जोरदार स्पर्धा सुरु होती. अखेर सनरायझर्स हैदराबाद संघाने शर्यतीत उडी घेतली आणि १३.२५ कोटींची बोली लावत त्याला आपल्या संघात स्थान दिले. आगामी हंगामात तो हैदराबाद संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसून येईल.
सॅम करन : आयपीएल मिनी ऑक्शन सुरु होण्यापूर्वीच असा अंदाज व्यक्त केला गेला होता की, सॅम करन हा सर्वात महागडा खेळाडू ठरणार. दरम्यान मिनी ऑक्शनमध्ये देखील असेच काहीसे चित्र पाहायला मिळाले. मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, चेन्नई सुपर किंग्ज, पंजाब किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स या संघांनी सॅम करन वर बोली लावली. हा खेळाडू आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. पंजाब किंग्ज संघाने तब्बल १८.५ कोटींची बोली लावत त्याला आपल्या संघात स्थान दिले आहे.
कॅमरन ग्रीन: ऑस्ट्रेलिया संघातील अष्टपैलू खेळाडू कॅमरन ग्रीन हा आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. मुंबई इंडियन्स संघाने त्याला १७.५ कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले आहे. कॅमरन ग्रीन देखील आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरू शकला असता. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्सने देखील कॅमरन ग्रीन वर बोली लावली होती.
बेन स्टोक्स: इंग्लंड कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्सला चेन्नई सुपर किंग्ज संघाने १६.२५ कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले आहे. बेन स्टोक्स हा आयपीएल इतिहासातील तिसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. बेन स्टोक्स हा अष्टपैलू खेळाडू आहे त्यामुळे सर्वच संघ त्याला आपल्या संघात घेण्यासाठी बोली लावत होते. मात्र शेवटी चेन्न्नई सुपर किंग्ज संघाने बाजी मारली. एमएस धोनीच्या निवृत्तीनंतर चेन्नई सुपर किंग्ज संघाला कर्णधाराची गरज भासणार आहे. त्यामुळे बेन स्टोक्स हा उत्तम पर्याय ठरू शकतो.
निकोलस पुरन : वेस्ट इंडिज संघातील आक्रमक फलंदाज निकोलस पुरन वर देखील मोठी बोली लागली आहे. निकोलस पुरन हा आयपीएल इतिहासातील वेस्ट इंडिजचा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. गतवर्षी त्याच्यावर १०.७५ कोटींची बोली लावली गेली होती. मात्र त्याला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. यावेळी तो लखनऊ सुपर जायंट्स संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसून येणार आहे. त्याला १६ कोटींची बोली लावत लखनऊ संघाने आपल्या संघात स्थान दिले आहे.
