जेव्हा एक अपशब्दच बनला गोलंदाजीचा प्रकार! वाचा कशी झाली 'चायनामॅन' गोलंदाजीची सुरुवात..

जेव्हा एक अपशब्दच बनला गोलंदाजीचा प्रकार! वाचा कशी झाली 'चायनामॅन' गोलंदाजीची सुरुवात..

भारत विरुद्ध बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने १८८ धावांनी विजय मिळवत १-० ची आघाडी घेतली आहे. पहिल्या कसोटी सामन्यात कुलदीप यादवच्या फिरकी गोलंदाजीचा दबदबा पाहायला मिळाला आहे. कुलदीप यादव हा चायनामॅन गोलंदाज आहे. मात्र चायनामॅन म्हणजे नक्की काय? या गोलंदाजी प्रकाराची सुरुवात कधीपासून झाली? याबाबत अधिक माहिती आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

डाव्या हाताचा गोलंदाज लेग स्पिन गोलंदाजी करतो तेव्हा त्याला चायनामॅन गोलंदाज असे म्हणतात. मात्र अनेकांना ही बाब माहीत नसावी, चायनामॅन ही गोलंदाजी ॲक्शन नसून एक अपशब्द आहे. होय,आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की, गोलंदाजी ॲक्शन शिवी कशी असू शकते. साध्या सरळ भाषेत सांगायचं झालं तर, चायनामॅन म्हणजे चिनी व्यक्ती. चिनी संघ क्रिकेटमध्ये हवा तितका पुढे नाहीये. मात्र ही गोलंदाजी सुरू करणारा गोलंदाज एलिस एचोंग नावाचा चिनी गोलंदाज होता.

तसं पाहायला गेलं तर,चायनामॅन गोलंदाजी पहिल्यांदा दक्षिण आफ्रिका संघातील गोलंदाज चार्ली लेवेलिनने केली होती. तर झाले असे की, २५ जुलै १९३३ रोजी इंग्लंड आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांमध्ये कसोटी सामना सुरू होता. वेस्ट इंडिज संघाकडून डाव्या हाताचा फिरकी गोलंदाज एलिस एचोंग गोलंदाजी करत होता. एलिस एचोंग हा मूळचा चीनचा होता. त्याने गोलंदाजीला आल्यानंतर अप्रतिम असा चेंडू टाकला, जो फलंदाजाला न कळताच यष्टीरक्षकाच्या हातात गेला. चेंडू जास्त फिरल्याने फलंदाज यष्टीचीत होऊन माघारी परतला.

फलंदाजाला इतका संताप आला होता की, तो बाद होऊन माघारी जात असताना गोलंदाजाला डवचून गेला. त्याने म्हटले होते की, "या चायनामॅनने मला जाळ्यात अडकवले आणि मी बाद झालो.."ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू रीची बेनोने याबाबत खुलासा केला होता. त्यानंतर एलिस एचोंगची ही गोलंदाजी ॲक्शन चायनामॅन म्हणून ओळखली जाऊ लागली. आता डाव्या हाताने लेग स्पिन गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाला चायनामॅन गोलंदाज म्हणतात.

 दक्षिण आफ्रिकेचा पॉल ॲडम्स, ऑस्ट्रेलियाचा मायकेल बेव्हन, सायमन कॅटिच, ब्रॅड हॉग, श्रीलंकेचा लक्षण रंगिका आणि भारताचा कुलदीप यादव हे गोलंदाज चायनामॅन गोलंदाजी करण्यासाठी ओळखले जातात.