भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये लवकरच ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होणार आहे. मालिकेतील पहिला सामना ९ फेब्रुवारी रोजी नागपूरच्या मैदानावर पार पडणार आहे. २००४ नंतर ऑस्ट्रेलिया संघाला भारतात एकही कसोटी मालिका जिंकता आली नाहीये. म्हणजे तब्बल १८ वर्षांपासून ऑस्ट्रेलिया संघ भारतात कसोटी मालिका जिंकण्याच्या प्रतिक्षेत आहे. भारतीय संघाने २००८, २०१०,२०१२ आणि २०१६ मध्ये झालेल्या कसोटी मालिकेत विजय मिळवला आहे. त्यामुळे भारतीय संघातील खेळाडू आगामी मालिकेत देखील चांगली कामगिरी करून मालिका जिंकण्याच्या प्रयत्नात असणार आहेत. दरम्यान ही मालिका सुरू होण्यापूर्वी आम्ही तुम्हाला अशा ५ फलंदाजांबद्दल माहिती देणार आहोत, ज्यांनी भारत - ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा केल्या आहेत.
सचिन तेंडुलकर:
या यादीत भारतीय संघातील दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर सर्वोच्च स्थानी आहे. सचिनने भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या कसोटी मालिकेदरम्यान सर्वाधिक धावा केल्या आहेत. इतकेच नव्हे तर, सचिन तेंडुलकर हा कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा फलंदाज देखील आहे. त्याने ३९ कसोटी सामन्यांमध्ये ५५ च्या सरासरीने ३६३० धावा केल्या आहेत. ज्यामध्ये ११ शतके आणि १६ अर्धशतकांचा समावेश आहे.
रिकी पाँटिंग:
रिकी पाँटिंग हा क्रिकेट इतिहासातील दिग्गज फलंदाजांपैकी एक आहे. तो भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकांमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज आहे. इतकेच नव्हे तर रिकी पाँटिंग हा ऑस्ट्रेलिया संघाकडून भारतीय संघाविरुद्ध खेळताना सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने २९ कसोटी सामन्यांमध्ये ५५ च्या सरासरीने २५५५ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ८ शतके आणि १२ अर्धशतके झळकावली आहेत.
वीवीएस लक्ष्मण :
ऑस्ट्रेलिया विरुध्द सामना असला की, वीवीएस लक्ष्मणची बॅट तळपायची. ऑस्ट्रेलिया विरुध्द खेळताना सर्वाधिक धावा करणारा वीवीएस लक्ष्मण हा तिसरा फलंदाज आहे. उजव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या या फलंदाजाने २९ सामन्यांतील ५४ डावांमध्ये २४३४ धावा केल्या. यादरम्यान त्याने ६ शतके आणि १२ अर्धशतके झळकावली.
राहुल द्रविड:
राहुल द्रविडला भारतीय संघाची भिंत असे म्हटले जायचे. जेव्हा जेव्हा भारतीय संघ अडचणीत असायचा त्यावेळी राहुल द्रविड भिंतीसारखा विरोधी सघांसमोर उभा राहायचा. ऑस्ट्रेलिया विरुध्द सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो चौथ्या स्थानी आहे. आतापर्यंत त्याने ३२ कसोटी सामन्यांमध्ये ४० च्या सरासरीने २१४३ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १३ अर्धशतके आणि २ शतके झळकावली आहेत.
मायकल क्लार्क:
ऑस्ट्रेलिया संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज मायकल क्लार्क या यादीत पाचव्या स्थानी आहे. क्लार्कने भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये झालेल्या मालिकांमध्ये २२ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने ५४ च्या सरासरीने २०४९ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ७ शतके आणि ६ अर्धशतके झळकावली आहेत.




