अंडर १९ क्रिकेट म्हणजे केवळ १९ वर्षांखालील क्रिकेटपटूंना खेळण्याची अनुमती दिली जाते. मात्र नुकताच संपन्न झालेल्या आयसीसी अंडर -१९ महिला टी -२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात १९ वर्षांपेक्षा अधिक असलेल्या खेळाडूने सहभाग घेतला होता. ही खेळाडू दुसरी तिसरी कोणी नसून, भारताला अंडर -१९ महिला टी -२० विश्वचषक जिंकून देणारी कर्णधार शेफाली वर्मा आहे.
शेफाली वर्मा २८ जानेवारी २०२३ रोजी १९ वर्षांची झाली. मात्र २९ जानेवारी रोजी झालेल्या अंतिम सामन्यात तिने सहभाग घेतला. जेव्हा एखादा खेळाडू अंडर -१९ विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना खेळत असेल तर तो १९ वर्षांपेक्षा कमी असायला हवा. तरीदेखील शेफाली वर्माला अंतिम सामना का खेळू दिला? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. मात्र हे सर्व कुठल्याही नियमांचे उल्लंघन न करता करण्यात आले आहे.
काय सांगतो अंडर -१९ क्रिकेटचा नियम?
अंडर -१९ क्रिकेटचा साधा सरळ नियम म्हणजे खेळाडू हा १९ वर्षांपेक्षा कमी असायला हवा. मात्र अंडर -१९ विश्वचषक स्पर्धेच्या दृष्टीने काही नियम बनवण्यात आले आहेत. संजू सॅमसनने देखील अंडर -१९ विश्वचषक स्पर्धेचे प्रतिनिधित्व केले त्यावेळी तो १९ वर्षांपेक्षा अधिक होता.
आयसीसी अंडर -१९ विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरण्यासाठी खेळाडूचे वय हे १ सप्टेंबर पासून मोजले जाते. तर विश्वचषक स्पर्धा वर्षाच्या सुरुवातीच्या ६ महिन्यांमध्ये होणार असेल तर, १ सप्टेंबर पर्यंत खेळाडूचे वय १९ असणे बंधनकारक आहे.
त्यामुळेच शेफाली वर्मा १९ वर्षांपेक्षा अधिक असूनही तिला अंडर -१९ विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना खेळण्याची संधी मिळाली. शेफाली वर्माचे वय १ सप्टेंबर २०२२ पर्यंत १९ वर्षांपेक्षा कमी होते. त्यामुळे ती या स्पर्धेचा अंतिम सामना खेळण्यास पात्र ठरली.
