क्रिकेट इतिहासातील ५ सर्वात लांब षटकार; ब्रेट लीने मारलाय सर्वात लांब षटकार...

क्रिकेट इतिहासातील ५ सर्वात लांब षटकार; ब्रेट लीने मारलाय सर्वात लांब षटकार...

क्रिकेटमध्ये फलंदाज जेव्हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर मारतात तेव्हा प्रेक्षकांचा उत्साह हा पाहण्यासारखा असतो. कसोटी क्रिकेटमध्ये हे खूप कमी पाहायला मिळतं. मात्र वनडे आणि टी -२० क्रिकेटमध्ये फलंदाजांकडून चौकार आणि षटकारांचा पाऊस पाहायला मिळत असतो. नुकताच संपलेल्या आयपीएल स्पर्धेत तर षटकारांचा देखील विक्रम मोडला गेला. या हंगामात १ हजार पेक्षा अधिक षटकार मारले गेले. तसेच क्रिकेटच्या इतिहासात देखील असे अनेक फलंदाज होऊन गेले ज्यांनी लांब षटकार मारले आहे. या लेखातून आम्ही तुम्हाला क्रिकेट इतिहासात सर्वात लांब षटकार मारणारे फलंदाज कोण आहेत याबाबत माहिती देणार आहोत.

१) सायमन ओ'डोनेल

 ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज सायमन ओ'डोनेल याने १९९३ मध्ये मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर पार पडलेल्या प्रथम श्रेणी क्रिकेट स्पर्धेत व्हिक्टोरिया संघाचे प्रतिनिधित्व करताना सर्वात लांब षटकार मारला होते. त्याने न्यू साऊथ वेल्स संघातील ग्रेग मॅथ्यूजच्या गोलंदाजीवर १२२ मीटर लांब षटकार मारला होता. तो चेंडू मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवरील ग्रेट साउदर्न स्टँडच्या तिसऱ्या माळ्यावर जाऊन पडला होता. 

२) एल्बी मॉर्केल:

एल्बी मॉर्केलने आयपीएल स्पर्धेत सर्वात लांब षटकार मारला होता. २००८ मध्ये पार पडलेल्या आयपीएलच्या पहिल्याच हंगामात एल्बी मॉर्केल चेन्नई सुपर किंग्ज संघाचे प्रतिनिधित्व करत होता. त्याने डेक्कन चार्जर्सविरुद्ध खेळताना १२५ मीटर लांब षटकार मारला होता. हा षटकार त्याने प्रज्ञान ओझाच्या गोलंदाजीवर मारला होता.

३) मार्टिन गप्टील:

टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा मार्टिन गप्टील या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. त्याने २०१२ मध्ये दक्षिण आफ्रिका विरुध्द झालेल्या सामन्यात लोनवाबो सोत्सोबेच्या गोलंदाजीवर १२७ मीटर लांब षटकार मारला होता. 

४) एडेन ब्लिजार्ड :

टी -२० क्रिकेटमध्ये आपल्या विस्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या एडेन ब्लिजार्डने जानेवारी २००८ मध्ये विक्टोरियन बुशरेंजर्स संघासाठी खेळताना सर्वात लांब षटकार मारला होता. त्याने वेगवान गोलंदाजाविरुध्द फलंदाजी करताना स्केवर लेगच्या दिशेने १३० मीटर लांब षटकार मारला होता.

५) ब्रेट ली :

क्रिकेट इतिहासात सर्वात लांब षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ब्रेट ली अव्वल स्थानी आहे. त्याने आपल्या संपूर्ण कसोटी कारकिर्दीत एकूण १८ षटकार मारले होते. त्यापैकी एक षटकार हा १३५ मीटर लांब होता. हा षटकार त्याने २००५ मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध झालेल्या सामन्यात मारला होता. डॅरेन पॉवेलच्या गोलंदाजीवर मारलेला हा षटकार १३५ मीटर लांब होता. तो चेंडू स्टेडियमच्या बाहेर जाऊन पडला होता.

काय वाटतं? कोण असेल तो फलंदाज जो ब्रेट लीचा १३५ मीटर लांब षटकार मारण्याचा विक्रम मोडू शकतो. कमेंट करून नक्की कळवा..