दरवर्षी ३ जून हा दिवस जगभरात जागतिक सायकल दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागे अनेक कारणं आणि फायदे सुद्धा आहेत. सायकल चालवल्याने पर्यावरण दूषित होत नाही. तर सायकल चालवण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ते आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे सायकल हा आपल्या आयुष्यातील एक महत्वाचा भाग आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आजही अनेक ठिकाणी शाळकरी विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी आणि शासकीय कर्मचारी आपल्या नोकरीच्या ठिकाणी पोहचण्यासाठी सायकलचा वापर करत असतात. (world cycle day)
सायकल चालवल्याने आपलं वजन वाढत नाही आणि व्यायाम देखील होत असतो. हेच फायदे समजावून सांगण्यासाठी जागतिक सायकल दिवस जगभरात साजरा केला जात असतो. आता तुम्हाला ही प्रश्न पडलाच असेल की, जागतिक सायकल दिवसाची सुरुवात कुठे आणि कधी झाली होती? चला तर जाणून घेऊया.
जागतिक सायकल दिवस कधीपासून साजरा होऊ लागला?
जागतिक सायकल दिवस २०१८ पासून साजरा करण्यात येत आहे. एप्रिल २०१८ मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेत हा निर्णय घेण्यात आला होता. त्यांनी हा दिवस साजरा करण्यासाठी ३ जून ही तारीख ठरवली होती. तेव्हा पासुन ते आतापर्यंत ३ जून रोजी संपूर्ण जगभरात जागतिक सायकल दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
जागतिक सायकल दिवस का साजरा केला जातो?
सध्या प्रगतीच्या वाटेवर असलेल्या मानवजातीला खूप वेगाने पुढे जायचं आहे. मोटार सायकल आणि कारचा शोध लागल्यापासून सायकल चालकांची संख्या दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे. तर अनेकांचा कल हा कमी वेळात हवं त्या ठिकाणी पोहचवण्यात मदत करणाऱ्या दुचाकीकडे वाढत चालला आहे. दुचाकी चालकांची संख्या वाढत चालल्याने प्रदूषण देखील वाढू लागले आहे. त्यामुळे सायकल चालवण्याचे काय फायदे आहेत. सायकल चालवल्याने आपले स्वास्थ्य निरोगी राहू शकते हे समजावून सांगण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी सायकल दिवसाची सुरुवात करण्यात आली.
जागतिक सायकल दिवस कुठल्या देशांमध्ये साजरा केला जातो?
ज्यावेळी संयुक्त राष्ट्र संघाने जागतिक सायकल दिवसाची घोषणा केली त्यावेळी अनेक देशांनी या निर्णयाचे स्वागत केले. दरवर्षी जागतिक सायकल दिवसाच्या दिवशी एक थीम ठरवली जाते. त्यानुसार जगातील अनेक देश हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करतात.
