भारत - बांगलादेश वनडे मालिकेत धावांचा पाऊस पाडणारे टॉप -५ फलंदाज...

भारत - बांगलादेश वनडे मालिकेत धावांचा पाऊस पाडणारे टॉप -५ फलंदाज...

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ डिसेंबर महिन्यात बांगलादेश दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे आणि २ कसोटी सामन्यांची मालिका पार पडणार आहे. ४ डिसेंबर पासून वनडे मालिकेला प्रारंभ होणार आहे. आतापर्यंत हे दोन्ही संघ ३५ वेळा आमने सामने आले आहेत. ज्यामध्ये भारतीय संघाने ३० वेळा बाजी मारली आहे. तर ५ वेळा भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. जुलै २०१९ नंतर पहिल्यांदाच हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. दरम्यान ही मालिका सुरू होण्यापूर्वी आम्ही तुम्हाला या भारत - बांगलादेश वनडे सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप -५ फलंदाजांबद्दल माहिती देणार आहोत. चला तर पाहूया.

१) विराट कोहली :

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली या यादीत सर्वोच्च स्थानी आहे. भारत विरुद्ध बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यांमध्ये विराट कोहलीने धावांचा पाऊस पाडला आहे. बांगलादेश संघाविरुद्ध खेळताना त्याने एकूण १२ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने ७५.५५ च्या सरासरीने ६८० धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ३ शतके आणि ३ अर्धशतके झळकावली आहेत. तसेच १३६ ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे.

२) रोहित शर्मा :

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. रोहित शर्मा बांगलादेश संघाविरुद्ध झालेल्या सामन्यांमध्ये १३ वेळा फलंदाजी करण्यासाठी आला आहे. यादरम्यान त्याने ६० च्या सरासरीने ६६० धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्याने ३ शतके आणि २ अर्धशतके झळकावली आहेत.१३७ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे.

३) मुश्फिकुर रहीम : 

बांगलादेश संघाचा अनुभवी फलंदाज मुश्फिकुर रहीम याने भारतीय संघाविरुद्ध झालेल्या २१ डावांमध्ये ३४.८८ च्या सरासरीने ६२८ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्याने एक शतक आणि तीन अर्धशतके झळकावली आहेत. तर ११७ धावा ही  त्याची सर्वोत्तम खेळी आहे.

४) तमिम इकबाल : 

बांगलादेश संघाचा कर्णधार तमिम इकबाल याने भारतीय संघाविरुद्ध एकूण १९ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने फलंदाजी करताना ३३.११ च्या सरासरीने ५९६ धावा केल्या आहेत. त्याने भारतीय संघाविरुद्ध एकूण ७ अर्धशतके झळकावली आहेत. तर ७० धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे.

५) गौतम गंभीर:

भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज गौतम गंभीर बांगलादेश संघाविरुद्ध खेळताना ११ वेळा फलंदाजी करण्यासाठी आला आहे. त्याने ५९.२० च्या सरासरीने ५९२ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने २ शतके आणि ३ अर्धशतके झळकावली आहेत. तर नाबाद १०७ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे.