टी -२० WC स्पर्धेत दिसणार युवा जोश!! अर्शदीप - नसिन सह या ५ युवा खेळाडूंवर असेल सर्वांचे लक्ष..

टी -२० WC स्पर्धेत दिसणार युवा जोश!! अर्शदीप - नसिन सह या ५ युवा खेळाडूंवर असेल सर्वांचे लक्ष..

आयसीसी टी -२० विश्वचषक २०२२ स्पर्धा सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. सर्व संघांनी आपल्या स्क्वाडची घोषणा देखील केली आहे. त्यामुळे क्रिकेट चाहते देखील ही स्पर्धा सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र यावेळी काही युवा खेळाडूंचा देखील जलवा पाहायला मिळणार आहे. चला तर नजर टाकुया या स्पर्धेतील टॉप -५ युवा खेळाडूंवर ज्यांच्या कामगिरीवर सर्वांचेच लक्ष लागून असणार आहे.

१) अर्शदीप सिंग (भारत) 

भारतीय संघाचा २३ वर्षीय युवा स्पीडस्टार अर्शदीप सिंगच्या कामगिरीवर सर्वांचेच लक्ष लागून असणार आहे. संघातील प्रमुख आणि अनुभवी गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे आयसीसी टी -२० विश्वचषक २०२२ स्पर्धेतून बाहेर झाला आहे. त्यामुळे आता शेवटच्या षटकांमध्ये षटक टाकण्याची जबाबदारी  अर्शदीप सिंगवर असणार आहे. त्याने भारतीय संघासाठी आतापर्यंत एकूण १३ टी -२० सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने १९ गडी बाद केले आहेत.

२) वृत्य अरविंद (युएई ) 

यूएई संघातील यष्टिरक्षक फलंदाज वृत्य अरविंद याने आतापर्यंत आपल्या संघासाठी जोरदार कामगिरी केली आहे. त्याने टी -२० विश्वचषक स्पर्धेतील क्वालिफायरच्या सामन्यात ९० च्या सरासरीने धावा केल्या होत्या. त्याने ५ डावांमध्ये २६७ धावा केल्या आहेत. २० वर्षीय वृत्य अरविंदने २०२० मध्ये टी -२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

३) फजलहक फारूकी (अफगानिस्तान) 

२२ वर्षीय फजलहक फारूकीने यावर्षी आपल्या संघासाठी सर्वाधिक गडी बाद करण्याचा पराक्रम केला आहे. त्याने आतापर्यंत २० पेक्षा ही कमीच्या सरासरीने १७ गडी बाद केले आहेत. यावर्षी झालेल्या आशिया चषक २०२२ स्पर्धेत त्याने जोरदार कामगिरी केली होती.

४) ट्रिस्टन स्टब्स (दक्षिण आफ्रिका) 

लीग स्पर्धांमध्ये जोरदार फटकेबाजी करणाऱ्या ट्रिस्टन स्टब्सच्या कामगिरीवर सर्वांचेच लक्ष असणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ट्रिस्टन स्टब्सने ८ सामने खेळले आहेत. या २२ वर्षीय फलंदाजाने २०० पेक्षा अधिकच्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत. ही कामगिरी पाहता ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी -२० विश्वचषक २०२२ स्पर्धेत देखील त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

५) नसीम शाह ( पाकिस्तान )

१९ वर्षीय नसीम शाहने आशिया चषक २०२२ स्पर्धेत आपल्या वेगवान गोलंदाजीने सर्वांनाच आश्चर्यचकित केले होते. त्यामुळे आयसीसी टी -२० विश्वचषक स्पर्धेत देखील त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. केवळ ६ टी -२० आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या नसीम शाहला कोरोनाची लागण झाली होती. मात्र तो आता पूर्णपणे फिट आहे.

 काय वाटतं? जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत अर्शदीप सिंग चांगली कामगिरी करेल का? कमेंट करून नक्की कळवा.