ज्यावेळी सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड आणि व्ही.व्ही. एस. लक्ष्मण यांची चौकडी भारतीय संघासाठी खेळायची. तो काळ भारतीय क्रिकेटमधील सुवर्णकाळ होता. या चारही खेळाडूंपैकी प्रमुख खेळाडू म्हणजे वेरी वेरी स्पेशल म्हणून ओळखला जाणारा व्ही.व्ही. एस. लक्ष्मण आज आपला ४८ वा वाढदिवस साजरा करतोय.
१ नोव्हेंबर १९७४ मध्ये जन्मलेल्या व्ही.व्ही. एस. लक्ष्मणने त्यावेळी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते, ज्यावेळी सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि राहुल द्रविड सारखे खेळाडू भारतीय संघातील प्रमुख खेळाडू होते. असे असताना देखील व्ही.व्ही. एस. लक्ष्मणने मागून येऊन भारतीय संघात आपली वेगळी ओळख निर्माण केली. २००१ मध्ये ऑस्ट्रेलिया संघाला पराभूत करण्यात व्ही.व्ही. एस. लक्ष्मणने मोलाची भूमिका बजावली होती.
कोलकाताच्या मैदानावर फॉलोऑन दिला असताना त्याने केलेल्या २८१ धावांच्या खेळीने भारताला सामना जिंकण्यात मदत झाली. याच खेळीनंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेरी वेरी स्पेशल लक्ष्मण म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली. हीच खेळी त्याच्या कारकिर्दीतील टर्निंग पॉइंट ठरली. आता जेव्हा जेव्हा व्ही.व्ही. एस. लक्ष्मणचा उल्लेख केला जातो. त्यावेळी त्याने केलेल्या २८१ धावांच्या खेळीचा देखील आवर्जून उल्लेख केला जातो.
त्या काळात सचिन तेंडुलकर फलंदाजीला आला की, ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना घाम फुटायचा. मात्र या खेळीनंतर ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज व्ही.व्ही. एस. लक्ष्मणला देखील घाबरु लागले. २००३-०४ मध्ये जेव्हा भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी व्ही.व्ही. एस. लक्ष्मण ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांवर तुटून पडला होता. या दौऱ्यावर त्याने २ शतके झळकावली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना व्ही.व्ही. एस. लक्ष्मण भारतीय संघासाठी संकटमोचक म्हणून मैदानात उतरायचा.
२००३-०४ चा ऑस्ट्रेलिया दौरा झाल्यानंतर स्वतः ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी मान्य केले होते की, व्ही.व्ही. एस. लक्ष्मण फलंदाजीला असताना त्याला कुठला चेंडू टाकावा हे त्यांना समजत नव्हते. २००८ मध्ये दिल्लीतील फिरोजशाह कोटला स्टेडियमवर झालेल्या सामन्यात त्याने ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध फलंदाजी करताना नाबाद २०० धावांची तुफानी खेळी केली होती. त्याने ऑस्ट्रेलिया संघाविरुध्द एकूण २९ कसोटी सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने ५० च्या सरासरीने २४३४ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ६ शतके झळकावली आहेत.
