सिक्सर किंग युवी साजरा करतोय ४१ वा वाढदिवस! बड्डे दिनी जाणून घ्या त्याच्या आयुष्यातील काही खास गोष्टी..

सिक्सर किंग युवी साजरा करतोय ४१ वा वाढदिवस! बड्डे दिनी जाणून घ्या त्याच्या आयुष्यातील काही खास गोष्टी..

भारतीय संघाचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग (Yuvraj Singh) हा आज (१२ डिसेंबर) आपला ४१ वा वाढदिवस साजरा करतोय. युवराज सिंगने आयसीसी टी -२० विश्वचषक २००७ आणि आयसीसी वनडे विश्वचषक २०११ स्पर्धेत भारताला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. जेव्हा जेव्हा युवराज सिंगचा उल्लेख केला जातो, तेव्हा प्रत्येकाला एकच गोष्ट आठवत असेल ती म्हणजे, लढवैय्या योद्धा. कॅन्सर असून सुद्धा भारताला विश्वचषक जिंकवून देणारा खेळाडू. तसेच टी -२० क्रिकेटमध्ये एकाच षटकात सहा षटकार मारणारा फलंदाज. अनेक विक्रम त्याने आपल्या नावे केले आहेत. आज त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी जाणून घ्या त्याच्या आयुष्यातील काही खास गोष्टी .

आज युवराज सिंग ४१ वा वाढदिवस साजरा करतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम करून काही वर्षे झाली आहेत. मात्र त्याने केलेल्या काही खेळ्या अश्या आहेत जे आजही कोणी विसरू शकत नाही. युवराज सिंगने २००७ टी -२० विश्वचषक स्पर्धेत इंग्लंड विरुध्द झालेल्या सामन्यात टी -२० क्रिकेटमधील सर्वात वेगवान अर्धशतक झळकावले होते. आजही हा विक्रम कुठल्याही फलंदाजाला मोडता आला नाहीये. त्याने अवघ्या १२ चेंडूंमध्ये हा पराक्रम केला होता.

तसेच युवराज सिंग हा विश्वचषक स्पर्धेत २ वेळेस प्लेअर ऑफ द सिरिजचा पुरस्कार मिळवणारा एकमेव खेळाडू आहेत. २००७ मध्ये झालेल्या टी -२० विश्वचषक स्पर्धेत आणि त्याच्या ४ वर्षानंतर म्हणजेच २०११ वनडे विश्वचषक स्पर्धेत देखील या खेळाडूने जबदरस्त कामगिरी करत प्लेअर ऑफ द सिरीजचा पुरस्कार मिळवला होता. 

आयसीसी टी -२० विश्वचषक, आयसीसी वनडे विश्वचषक आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी या मानाच्या स्पर्धा मानल्या जातात. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळणं हे प्रत्येक खेळाडूचं स्वप्नं असतं. युवराज सिंगच्या नशिबात ७ वेळेस या स्पर्धेतील अंतिम सामना खेळण्याचा योग आला आहे. त्याने २००२ चॅम्पियन्स ट्रॉफी, २००३ वनडे विश्वचषक, २००७ टी -२० विश्वचषक, २०११ वनडे विश्वचषक, २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफी, २०१४ टी -२० विश्वचषक आणि २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तो सर्वाधिक अंतिम सामने खेळणारा जगातील पहिला खेळाडू आहे. 

कॅन्सर असून सुद्धा जिंकवून दिला विश्वचषक..

वनडे विश्वचषक २०११ स्पर्धेत युवराज सिंगने जोरदार कामगिरी केली होती. ज्यावेळी तो मैदानावर धावांचा पाऊस पाडत होता, त्यावेळी त्याला कल्पनाही नव्हती की, त्याला कॅन्सर सारखा भयानक आजार झाला आहे. ही स्पर्धा होताच, त्याला कॅन्सर असल्याची बातमी मिळाली आणि कोट्यवधी क्रिकेट चाहत्यांचे डोळे भरून आले. मात्र त्याने धीर न सोडता अमेरिकेत उपचार घेतले. काही महिने संघर्ष केल्यानंतर त्याने कॅन्सरला मात दिली. इतकेच नव्हे तर मैदानावर पुनरागमन देखील केले होते.