एक वेळ अशी होती जेव्हा वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक पूर्ण करणं खूप कठीण होतं. मात्र भारताचा मास्टर ब्लास्टर फलंदाज सचिन तेंडुलकर याने २०१० मध्ये दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध पहिले द्विशतक झळकावले. त्यानंतर हिटमॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने देखील या क्लबमध्ये प्रवेश केला. त्याने एक, दोन नव्हे तर तब्बल तीन वेळेस द्विशतक झळकावण्याचा पराक्रम केला. एक द्विशतक ऑस्ट्रेलिया विरुध्द तर उर्वरित दोन द्विशतके त्याने श्रीलंका संघाविरुद्ध झळकावली होती. यापैकी एक द्विशतकी खेळी त्याने आजच्याच दिवशी म्हणजे १३ डिसेंबर २०१७ रोजी केली होती.
रोहित शर्माने ज्यावेळी द्विशतकी खेळी केली, त्याच्या ३ दिवसांपूर्वीच भारतीय संघाचा डाव अवघ्या ११२ धावांवर कोसळला होता. मात्र पुढील सामन्यात भारतीय संघाने सर्व काही विसरून श्रीलंकन गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. रोहित शर्माच्या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने ३९२ धावांचा डोंगर उभारला होता.
सुरुवातीपासूनच केली श्रीलंकन गोलंदाजांची धुलाई..
या सामन्यात रोहित शर्माने नाणेफेक गमावले होते. मात्र श्रीलंकेचा कर्णधार थिसारा परेरा याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा हा पूर्णपणे फसला कारण भारतीय फलंदाजांनी सुरुवाती पासूनच आक्रमण करायला सुरुवात केली होती. सुरुवातीला रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी ११५ धावांची भागीदारी केली. धवन ६८ धावा करत माघारी परतला. त्यानंतर श्रेयस अय्यरने ८८ धावांची खेळी केली.
अय्यर ४६ व्या षटकात माघारी परतला. तर एमएस धोनी अवघ्या ७ धावा करू शकला. मात्र रोहित शर्माने श्रीलंकेच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याने १५३ चेंडूंचा सामना करत १३ चौकार आणि १२ षटकारांचा साहाय्याने २०८ धावांची खेळी केली. या खेळीची खासियत म्हणजे, रोहित शर्मा हा वनडे क्रिकेटच्या इतिहासात ३ वेळेस द्विशतकी खेळी करणारा पहिलाच फलंदाज ठरला. हा विक्रम कुठल्याही फलंदाजाला मोडता आला नाहीये. तसेच हा विक्रम मोडण्याची शक्यता देखील खूप कमी आहे.
लंकेचा दारुण पराभव..
श्रीलंका संघाला विजय मिळवण्यासाठी ३९३ धावांची आवश्यकता होती. मात्र हा डोंगर सर करताना श्रीलंकन संघाला अवघ्या २५१ धावा करता आल्या. श्रीलंका संघातील अनुभवी फलंदाज अँजेलो मॅथ्यूज याने सर्वाधिक १११ धावांची खेळी केली होती. तर इतर फलंदाजांना हवी तशी कामगिरी करता आली नव्हती.




