आज भारतीय सिनेमाला १०६ वर्षे पूर्ण होत आहेत. १९१३ साली ३ मे रोजी 'राजा हरिश्चंद्र' या मूकपटाचा पहिला प्रयोग सादर करण्यात आला. दादासाहेब फाळकेंना सिनेनिर्मितीच्या वेडाने कसे आणि किती झपाटले होते याची काहीशी झलक आपण 'हरिश्चंद्राची फॅक्टरी'मध्ये पाहिली आहेच.
'राजा हरिश्चंद्र'ही सर्वांना खरंतर माहिती असलेली कथा. तिचं सलग नाट्यरूपांतर करून तिचंच बरंचसं एकसलग चित्रिकरण या ४० मिनिटांच्या चित्रपटात दाखवण्यात आलं होतं. या मूकसिनेमाला हिंदी, मराठी आणि इंग्रजी भाषेत मध्ये-मध्ये कथावस्तू समजावून सांगणार्या पाट्या असल्या तरी बहुतेक सर्व कलाकार मराठी असल्याने हा प्रथम मराठी चित्रपटही गणला जातो. तेव्हा या सिनेमाची एकच प्रिंट काढण्यात आली होती आणि सिनेमाचा हा पहिलाच प्रयोग तिकिटबारीवर तुफान यशस्वी झाला होता.
स्त्रीभूमिका करायला कुणी न मिळण्याच्या त्या काळात आण्णा साळुंखे यांनी तेव्हा राणी तारामतीचा रोल केला होता.

आज भारताची गणना जगातील सर्वाधिक चित्रपट बनवणार्या देशांत होते. त्याचा पाया दादासाहेब फाळकेंनी १०६ वर्षांपूर्वी घातला.
