दूरदर्शनच्या काळात जास्त चॉईस नव्हता म्हणून कितीही आरडाओरड केली तरी आज सतत गळणार्या टीव्हीपेक्षा तेव्हाच्या कार्यक्रमांचा दर्जा चांगला होता हे कुणीही मान्य करेल. आठवड्यातून एकदाच येणार्या मालिका, चित्रहार, रंगोली आणि छायागीत, रविवारचे आणि सुटीचे कार्यक्रम हे सगळं मर्यादित असलं तरी छान होतं. दूरदर्शनवर दाखवली जाणारी राष्ट्रीय एकात्मतेवरची गाणीही तितकीच उत्कृष्ट होती. अजूनही कुणीतरी त्या गाण्यांचे व्हिडिओ व्हाटसऍपवर शेअर करतं आणि व्हिडिओ बघताना जाणवतं की अजून आपल्याला ती सगळी गाणी पूर्ण पाठ आहेत.
’विविधतेतही एकता’ या भावनेने नटलेला आपला भारत देश. भाषा, प्रांत, संस्कृती या सगळ्यांत वेगळा आणि तरीही एका सूत्राने एकत्र बांधला गेलेला. आज चॅनेल्सच्या गर्दीत हरवून गेलेल्या या गाण्यांच्या आठवणी पुन्हा जाग्या करूयात..
