बोटं मोडल्यावर येणारा कट-कट आवाज ही लहानपणापासून कुतुहलाची बाब आहे. कडाकडा बोटं मोडण्याची सवय असलेल्या व्यक्तींकडे बर्याच वेळा इतर लोक रागाने बघतात. चार चौघांत बोटं मोडणं काही वेळा अशुभही मानलं जातं. बर्याच जणांना ठरावीक वेळाने बोटं मोडण्याची सवय असते. काही जण तर शरीरातले हलणारे सगळे सांधे मोडून बघतात.
उदाहरणार्थ, काहीजण बराच वेळ संगणकावर काम केल्यावर छताकडे मान वळवून मानेचे सांधे मोडतात तर काही कंबर डावी उजवीकडे वळवून सांधे मोडतात. हा सांध्यांतून येणारा आवाज नेमका कसा येतो या बाबत शास्त्रज्ञांमध्ये अनेक वेगवेगळी मते प्रचलित होती. एमआरआय किंवा अल्ट्रासाऊंडसारखी नवी तंत्रे आल्यानंतर केलेल्या संशोधनानंतर असे लक्षात आले आहे की सांध्यांमध्ये असलेल्या सायनोव्हिअल फ्लुइड या द्रव पदार्थात तयार होणार्या वायुंचे बुडबुडे फुटल्यामुळे हा आवाज येतो. सोबत असलेल्या चित्र फितीत बघा बोटे मोडताना नक्की काय होते ते.




