सैराट पाहण्याची चार कारणे

लिस्टिकल
सैराट पाहण्याची चार कारणे

गेले महिनाभर सैराटचा धुमाकूळ चालू आहे. आधी काही टीझर्स, मग ट्रेलर्स आणि मग गाणी. रिलीज होण्यापूर्वी त्यांनी चांगलीच हवा निर्माण केलीय आणि त्यांच्या स्वागतासाठी वातावरण ’झिंगाट’ करून सोडलंय. ट्रेलर्सवरून चित्रपट कशाबद्दल असावा याची कल्पना येत असली तरी हा आवर्जून पाहावा असा ’हटके’ सिनेमा आहे. 

सैराट का पाहू नये व्हॉटसऍप संदेश फिरायला आधीच सुरूवात झालीय.  बोभाटा.कॉम घेऊन आलं आहे  सैराट का पाहावा याची पाच मुख्य कारणं..

१. अत्यंत सुंदर छायांकन म्हणजेच शुद्ध मराठीत- सिनेमॅटोग्राफी!

१. अत्यंत सुंदर छायांकन म्हणजेच शुद्ध मराठीत- सिनेमॅटोग्राफी!

सैराटचे ट्रेलर्स पाहिले असतील तर काही दृश्य अगदी वेड लागावं इतकी सुंदर आहेत. एका कुंडाकडे जात असणार्‍या पायर्‍या आर्ची उतरत असतानाचा उन-सावल्यांचा खेळ, प्राचीन मंदिर आणि त्याचा व्हरांडा, पोहतानाची विहिर, सांजवेळी मारलेला नदीतला सूर.. यादी तशी बरीच आहे. पेटलेल्या शेताच्या रौद्रपणातदेखील एक सौंदर्य आहे. नदीकाठचा झोपाळा कितीही कृत्रिम वाटला तरी त्या फ्रेम्सदेखील सुंदर आहेत.

सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यातलीच ही लोकेशन्स आजवर दुर्लक्षित कशी राहिली याचंच आश्चर्य वाटतं. 

 

२. अजय-अतुल यांचे सिंफनी-ऑर्केस्ट्रॉ संगीत

२. अजय-अतुल यांचे सिंफनी-ऑर्केस्ट्रॉ संगीत

सिंफनी म्हटलं की सर्वात आधी मोत्झार्ट आठवतो. मराठी किंवा एकंदर भारतीय संगीतात अजून परदेशात जाऊन असे काही प्रयोग करण्याचे प्रसंग घडलेले नाहीत. या पद्धतीचा आरंभ करण्याचा मान ’सैराट’कडे जातो. ’याड लागलं’ हे अस्सल सोलापूरच्या मातीतलं गाणं जेव्हा सिंफनीच्या तालासुरासोबत समोर येतं तेव्हा हे फ्यूजन आणखीच गोड वाटतं.

’झी’सारखा तगडा फायनान्सर नसता तर हे शक्य झालं असतं की नाही शंका आहे.

३. रिंकू राजगुरू

३. रिंकू राजगुरू

नागराज मंजुळे हे नवख्या कलाकाराकडूनही उत्तम अभिनय करून घेण्यात पटाईत आहेत. मग तो जब्या असो वा पिस्तुल्या. इथे रिंकूच्या रूपाने त्यांना रत्न गवसलंय. चवळीची शेंग, गोरीपान, उंचनिंच अशा नेहमीच्या हिरॉईनच्या व्याख्येत न बसणारी थोडीशी ठेंगणी, काहीशी स्थूल आणि घनदाट केशसंभाराची ही नववीतली मुलगी नुसत्या डोळ्यांतून बोलून जातेय. या अकलूजच्या (सोलपुर) पोरीने पहिल्याच चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार पण पटकावलाय.

४. नागराज मंजुळे

४. नागराज मंजुळे

नागराज पोपटराव मंजुळे, बस नामही काफी है. 

समाजाच्या ज्या अंतरंगाचं सहसा सिनेमातून चित्रण होत नाही नेमकं तेच दाखवणार्‍या नागराज मंजुळेंचा हा सिनेमापण आधीच्या सिनेमांइतका भारी असेल यात शंका नाही.

टॅग्स:

nagraj manjule

संबंधित लेख