आठ टुर्नामेंटनंतर सिंधूने गाठली अंतिम फेरी!! सुपर ५०० जेतेपदापासून केवळ एक पाऊल दूर..

आठ टुर्नामेंटनंतर सिंधूने गाठली अंतिम फेरी!! सुपर ५०० जेतेपदापासून केवळ एक पाऊल दूर..

भारतीय बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू सध्या चर्चेचा विषय ठरतेय. शनिवारी (१६ जुलै) झालेल्या महिला एकेरी फेरीत तिने उपांत्य फेरीचा सामना जिंकून अंतिम फेरीत धडक दिली आहे. तिने उपांत्य फेरीतील सामन्यात जपानच्या साएना कावाकामीचा धुव्वा उडवत सिंगापूर ओपन स्पर्धेची अंतिम फेरीत गाठली आहे. दोन वेळेस ऑलिम्पिक पदक विजेत्या पी व्ही सिंधूने यावर्षी झालेल्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय आणि स्विस ओपन स्पर्धेचे जेतेपद मिळवले आहे. ३२ मिनिटं सुरू राहिलेल्या या सामन्यात तिने २१-१५, २१-७ ने विजय मिळवला. (PV Sindhu)

 आता २०२२ मधील पहिला सुपर ५०० जेतेपद मिळवण्यापासून ती केवळ एक पाऊल दूर आहे. यापूर्वी मार्च २०२२ मध्ये स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या योनेक्स स्विस ओपन स्पर्धेत तिने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तसेच या स्पर्धेचे जेतेपद देखील मिळवले होते. तसेच साएना कावाकामी आणि सिंधू हे यापूर्वी दोन वेळेस आमने सामने आले होते. ज्यामध्ये सिंधूने दोन्ही वेळेस बाजी मारली होती. आता सलग तिसरा विजय मिळवत तिने ३-० ची आघाडी घेतली आहे.

विश्वविजेत्या पी व्ही सिंधूने सामन्याच्या सुरुवातीपासूनच साएना कावाकामीवर हल्लाबोल करायला सुरुवात केली होती. या सामन्यात साएना कावाकामीने काही चुका केल्या ज्याचा सिंधूने पुरेपूर फायदा घेत आघाडी घेतली. सिंधूने जोरदार स्मॅश मारत ब्रेकपर्यंत ३ गुणांची आघाडी घेतली होती. त्यानंतर साएना कावाकामीने देखील बरोबरीची टक्कर दिली. त्यामुळे दोन्ही खेळाडूंमध्ये एक एक गुण मिळवण्यासाठी जोरदार लढत पाहायला मिळत होती.

सिंधूने पहिला गेम २१-१५ ने आपल्या नावावर केला. सिंधूने साएना कावाकामीने सुरुवातीपासून अडकवून ठेवलं होतं. ती साएना कावाकामी कडून चूक होण्याची वाट पाहत होती. संधी मिळताच ती जोरदार आक्रमण देखील करत होती. ११-४ च्या ब्रेकनंतर सिंधूने १७-५ ची आघाडी घेतली. सिंधूच्या फोरहॅण्डचे साएना कावाकामीकडे प्रत्युत्तर नसल्याने सिंधूने १९-६ ची आघाडी घेतली. शेवटी या ब्रेकमध्ये २१-७ ने विजय मिळवत,सिंधूने अंतिम फेरीत जोरदार प्रवेश केला.