गेला संपूर्ण आठवडा पहालाज निहलानी -अनुराग कश्यप यांची धुळवड आपण वेगवेगळ्या माध्यमांतून बघत आहोत, वाचत आहोत. उडता पंजाब येईल आणि जाईलही. अनुराग कश्यप कचाकच शिव्यांनी भरलेला दुसरा (तिसरा ?) चित्रपटही घेऊन येईल. धूळ खाली बसेल. काही दिवसांनी नवीन वावटळ येईल आणि मर्ढेकर म्हणतात तसे इसवी सन कवायतीचा कदम उचलून पुढे सरकेल. पण आपण कदाचित "आम्हांस आम्ही पुन्हा पहावें काढुनि चष्मा डोळ्यांवरचा!" असे घडणार नाही.
’उडता पंजाब’ ही पंजाबच्या समस्येची कहाणी आहे आणि एखाद्या राष्ट्रीय समस्येचे अवलोकन आपण त्या समस्येचा सिनेमा झाल्याशिवाय समजू शकत नाही या पेक्षा मोठी राष्ट्रीय शोकांतिका नाही.

पंजाबमधील ५१% तरुण ड्रग्सच्या आहारी गेले आहेत. इतकंच नाही तर हा आकडा दिवसेंदिवस वाढतोय. ७५००० कोटी रुपयांची इथे वार्षिक उलाढाल होते, त्यातले ६५०० कोटी रूपये फक्त हिरॉईनवर खर्च होतात. बरं मग हे ड्रग्स येतात कुठून? त्यांचा प्रवास हा आधी अफगाणिस्तान, मग पाकिस्तान आणि तिथून बेकायदेशीररित्या पंजाब आणि देशातील इतर भागांत होतो. पाकिस्तानची सीमा जवळ असल्याने अफगाणिस्तानच्या शेतातील अफू पंजाबमध्ये पोहोचायला जास्त वेळ लागत नाही. आज पंजाबमध्ये ड्रग्स घेणार्यांपैकी ७६% लोक हे १८ ते ३५ वयोगटातील आहेत. हे आकडयांवरून लक्षात येतं की ज्या समस्येवर आज एक सिनेमा बनून गदारोळ होतो आणि त्यातील काही दृश्यांना आपले सो कॉल्ड सेन्सोर बोर्ड कात्री लावतात, खरं तर ती समस्या प्रत्यक्षात त्याहूनही भयानक आहे.
सत्य नागडं असतं असं म्हणतात. आपण आपल्याच समस्येपासून तोंड लपवून पळत आहोत का? वेळीच यावर उपाय नाही झाला तर काही दिवसांनी उडता पंजाबच्या जागी ‘बुडता पंजाब’ म्हणायची मात्र वेळ येईल.
