दिनविशेष : ना. धों महानोरांच्या वाढदिवशी त्यांची प्रसिद्ध ५ गाणी

लिस्टिकल
दिनविशेष : ना. धों महानोरांच्या वाढदिवशी त्यांची प्रसिद्ध ५ गाणी

नामदेव धोंडो महानोर.. महाराष्ट्राचे लाडके निसर्गकवी. १६ सप्टेंबर१९४२चा त्यांचा जन्म.

निसर्गावरच्या अगदी गेयपूर्ण कविता लिहिण्यात यांचा भारी हातखंडा आहे. आठवा निवडुंग, सर्जा, जैत रे जैत, अजिंठा मधली गाणी.. अर्थात ही फक्त उदाहरणादाखल झाली. 
मोडक्या संसाराची लाज सोडून हिरव्या पानात सावळ चालणं असो की सोन्याचा पदर असलेली बंधूंची बायको.. त्यांची गाणी मनाला भुरळ घालतातच..

मराठी कवितांचा इतिहास ना. धो. महानोरांच्या कवितांच्या उल्लेखाशिवाय अपूर्ण आहे. निसर्गावर कविता करणार्‍या महानोरांच्या कविता तुम्ही खूप सार्‍या सिनेमांत ऐकल्या असतील. जितक्या प्रेमाने ते कविता करतात, तितकंच शेतीवरही त्यांचं प्रेम आहे. आजच्या त्यांच्या जन्मदिनी बोभाटा.कॉम घेऊन आले आहे महानोरांची काही प्रसिद्ध गाणी. 

आम्हांला सांगा  यातलं तुमचं आवडतं गाणं कोणतं आहे ते..

जैत रे जैत- मी रात टाकली

जैत रे जैत मधली सगळी गाणी महानोरांनी लिहिली होती. लिंगोबाचा डोंगर, जांभूळ पिकल्या झाडाखाली, असं एखादं पाखरू वेल्हाळ, नभ उतरू आलं किंवा आम्ही ठाकर ही गाणीही रसिकांची तितकीच आवडीची आहेत. 

राजसा जवळी जरा बसा

गाण्यासाठी अत्यंत अवघड अशी ही बैठकीची लावणी. बऱ्याचजणींनी ही लावणी गाण्याचा प्रयत्न करून स्वतःचं हसं करून घेतलंय..

शृंगारिक पण अश्लील नसलेली ही एक सुरेख लावणी आहे..

अजिंठा-मन चिंब पावसाळी

’जैत रे जैत’ सारखीच ’अजिंठा ’ मधली सर्व गाणी पुन्हा एकदा महानोरांचीच.  जैत रे जैतची नक्कल अजिंठाला करणं तितकं जमलं नाही खरं..

मुक्ता- वळण वाटातल्या झाडीत हिरवे छंद

मुक्ता या जब्बार पटेलांच्या सिनेमातली ’वळण वाटातल्या झाडीत हिरवे छंद’ आणि ’जाईजुईचा गंध मातीला’ ही गाणी खास महानोर छापाची.

सोनाली कुलकर्णी, विक्रम गोखले आदींच्याया अभिनयानं नटलेला मुक्ता किमान एकदा तरी पाहायलाच हवा..

सर्जा-चिंब पावसानं रान झालं आबादानी

’चिंब पावसानं’ या गाण्यातला ’आबादानी’ हा शब्द असो किंवा ’तुझ्या डोळ्यांच्या सांदीत, सावल्यांची राणी’ , हे शब्दप्रयोग महानोरच करू जाणे. महानोरांनी खूप कमी सिनेमांसाठी गीते लिहिली. सर्जासुध्दा त्यातलाच एक सिनेमा.