एकच गाणं , वेगवेगळ्या गायकांच्या आवाजात. तुम्हांला कोणाच्या आवाजात हे गाणं अधिक आवडतं?

लिस्टिकल
एकच गाणं , वेगवेगळ्या गायकांच्या आवाजात. तुम्हांला कोणाच्या आवाजात हे गाणं अधिक आवडतं?

काही गाणी अनेक गायकांना आणि संगीतकारांना भुरळ घालतात. मग प्रत्येकजण थोड्याफार फरकाने ती सादर करतात. कधीकधी सूर-ताल तेच असले तरी केवळ आवाजातल्या पोतामुळं गाण्यात फरक पडतो आणि ते कमी किंवा अधिक आवडायला लागतं.  सांगा बरं, ’दिल हूँ हूँ करे’ हे गाणं भूपेन हजारिकांच्या आवाजात अधिक आवडतं की लता मंगेशकरांच्या? आहे ना गंमत? आपल्याला गाण्यातलं काही फारसं कळत नाही पण जे काही ऐकलं जातं त्यातून आपले आपण काही ग्रह करून घेतो. अशा ग्रहांचा परिपाक म्हणजे गाणे आणि तराणे ही लेखमाला आणि हे त्यातलं पहिलं पुष्प -

तर आज बोभाटा घेऊन आलंय एकच गीत पण तीन वेगवेगळ्या गायकांच्या आवाजात. सांगा बरं तुम्हांला यातलं कोणतं जास्त आवडतं ते!! 

अबिदा परवीन

यू-ट्यूबवर नुकतीच अबिदा परविन यांनी गायलेली ’कल चौदहवीं की रात थी’ ही गजल ऐकली. अबिदाजी या गजलेतील प्रत्येक नज्म फार ताकदीने आपल्यापर्यंत पोहोचवतात. त्यांचा सूरही अगदी ठाशीव ऐकू येतो. असं असूनही का कुणास ठाऊक वाटतं की इब्न-ए-इन्शांचे शब्द, त्या आपल्यापर्यंत अगदी वृत्त-निवेदकाच्या शैलीत आणतायत.

गुलाम अली

हेच गाणं जेव्हा छोटे गुलाम अली खाँ गातात तेव्हा आपला अनुभव वेगळा असतो. सगळं लक्ष ते स्वत:कडे वेधून घेतात. इब्ने इन्शा साहेबांचे शब्द ते आपल्यापर्यंत आणतात, त्यातली गोष्ट ते आपल्याला सांगतात पण हे सगळं करताना त्यात महत्त्वाचा भाव दिसतो तो म्हणजे नज्मपेक्षा माझं सादरीकरण बघा, माझी गायकी बघा, माझ्या ताना ऐका, माझ्या आवाजातली फिरक ऐका...

काय म्हणता?

जगजीत सिंग

आता ही गजल जगजीत सिंह गातात तेव्हा आणखी निराळा अनुभव येतो. असं वाटतं की आपला एखादा मित्र आपल्याशी बोलतोय, आपलं मन मोकळं करतोय. तो त्याच्या प्रेमपात्राचं वर्णन करत जणू आपली स्वत:ची गोष्टच सांगतोय. हे सांगणंही चारचौघात डंके की चोट पर सारखं नाही आहे तर एखादं गुपित सांगावं तसं हळूवारपणे सांगतोय. हे गुपित ऐकणार्‍या मित्राच्या भूमिकेत आपण नकळतपणे असे शिरतो की ही गजल जगजीत सिहांइतकीच आपलीही बनून जाते.

बोला, वाटतं की नाही?