रिलायन्स जिओने जगातलं सर्वात स्वस्त 4G नेटवर्क लॉन्च केलं आणि देशातील तमाम नेट शौकीनांची दिवाळी ऐन गणपतीतच सुरू झाली. जिओचं सिम मिळवण्यासाठी जणू प्रत्येकजण आटोकाट प्रयत्न करत असतानाच जिओला टक्कर देण्यासाठी या डेटावॉर मध्ये उतरली आहे आपली सरकारी कंपनी 'बीएसएनएल'!!
हो.. भारताची सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी जिओपेक्षा स्वस्त डेटा प्लान्स उपलब्ध केले आहेत. येत्या 9 सप्टेंबरपासुन कंपनी BB 249 नावाचा ब्रॉडबँड प्लान सादर करत आहे ज्यानुसार आपण 2 MBPS स्पिड ने 300 GB इंटरनेट वापरू शकतो! इकडे जिओचा 30 दिवसांचा डेटा पॅक 499 रुपयात 4GB असा आहे तर बीएसएनएल आपल्याला 10 दिवसांसाठी 156 रुपयात 2 GB डाटा देणार आहे. (म्हणजेच 30 दिवसांसाठी 468 रुपयात 6 GB) सोबत बीएसएनएल ने 1099 रू. चा एक 3G प्लानही सादर केलाय ज्यात आपल्या एका महिन्यासाठी अनलिमिटेड 3G डाटा वापरता येईल.
टेलिकॉम कंपन्यांमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेत बीएसएनएल मागे राहणार नाही असा कंपनीचा दावा आहे. काही असो.. एअरटेल आणि आयडियाही आपल्या डेटा प्लान्सचे दर कमी करत आहेत. काहीही असो, यांच्या चढाओढीत आपल्या नेटकऱ्यांच उखळं पांढरं होतंय हे नक्की.. तेव्हा तुम्ही सिमकार्डसाठी अजिबात घाई करू नका.. आखिर सब्र का फल मिठा होता है !
