अजूनही गूढ न उकललेलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष केनेडींचं हत्याकांड!! म्हणतात की रहस्य 'त्या' लायब्ररीच्या ६व्या मजल्यावर दडलंय!

लिस्टिकल
अजूनही गूढ न उकललेलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष केनेडींचं हत्याकांड!! म्हणतात की रहस्य 'त्या' लायब्ररीच्या ६व्या मजल्यावर दडलंय!

'चांगल्या कामाचं फळ चांगलंच मिळतं' हे बहुधा राजकारणात खरं ठरत नाही. उलट चांगलं काम करणाऱ्याला अनेक शत्रू निर्माण होतात. अनेकदा ते त्याच्या जिवावरही उठतात. जगभरातला इतिहास हेच सांगतो. याला अमेरिकेचे ३५वे अध्यक्ष जॉन एफ केनेडी हेही अपवाद नव्हते.

अमेरिकेचे सर्वात तरुण राष्ट्राध्यक्ष, पहिला रोमन कॅथलिक अध्यक्ष आणि त्याचबरोबर सगळ्यात लोकप्रिय अध्यक्ष म्हणून केनेडींची अल्प कारकीर्द गाजली.

जॉन एफ. केनेडींचा जन्म श्रीमंत घरात झाला. त्यांचे वडील इंग्लंडमध्ये अमेरिकेचे वकील म्हणून काम करत होते. लहानपणी जॉन सतत आजारी असायचा. त्याला ऍडिसन्स डिसीज हा दुर्मिळ विकार होता, असं पुढे निदान झालं. पदवी मिळाल्यावर जॉनने वडिलांचे स्वीय सहायक म्हणून काम केलं. पुढे त्यांनी नौदलात नोकरी स्वीकारली. नौदलात असताना एकदा जपानने केलेल्या हल्ल्यादरम्यान आपल्या सहकाऱ्यांना वाचवल्याबद्दल त्यांना मेडल वगैरेही मिळालं. नंतर त्यांनी पत्रकारितेतही काही काळ घालवला. त्यानंतर ते राजकारणात गेले. १९४७ ते १९५३ अशी सहा वर्षं लोकप्रतिनिधी म्हणून काम केल्यावर १९५३ मध्ये ते थेट सेनेटर बनले. पुढे १९६१ मध्ये अध्यक्षीय निवडणुकीत रिचर्ड निक्सनवर विजय मिळवून जॉन अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बनले. या निवडणुकीआधी त्यांनी टीव्हीवरच्या एका वादचर्चेत सहभाग घेतला होता, हे प्रक्षेपण लाखो लोकांनी पाहिलं होतं. त्याचाही त्यांना निवडणुकीत बराच फायदा झाला असं जाणकार म्हणतात.

केनेडी निवडून आल्यानंतर पहिल्याच वर्षात पीस कॉर्प्स हा कार्यक्रम कार्यान्वित झाला. त्याअंतर्गत जगभरातल्या अविकसित देशांमध्ये तरुण स्वयंसेवकांना पाठवण्यात आलं. जगभरात मैत्री आणि शांतता निर्माण करणं असं उदात्त ध्येय ठेवत हा कार्यक्रम राबवला गेला. जगात जिथे गरज आहे तिथे संबंधितांना मदत आणि प्रशिक्षण देणं आणि इतर देशांना अमेरिका काय आहे हे समजावून देणं हेही यामागचे हेतू होते. पण त्यांच्या कारकिर्दीतील पहिलंच गाजलेलं प्रकरण म्हणजे क्युबन क्षेपणास्त्र प्रकरण. हे प्रकरण थोडक्यात असं होतं :

दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका आणि रशिया यांच्यात तीव्र स्पर्धा निर्माण झाली. पाश्चात्त्य देशांच्या दबावाला दूर करून आपलं वर्चस्व निर्माण करण्यासाठी रशियाची जोरदार धडपड सुरू होती, विशेषतः संरक्षण क्षेत्राच्या बळकटीकरणाला रशियाने महत्त्व दिलं होतं. अमेरिकेनेही इटली, तुर्कस्थान यांच्या जमिनींवर आपले लष्करी तळ उभारले होते. अमेरिकन क्षेपणास्त्रं मॉस्कोपासून अक्षरशः हाकेच्या अंतरावर आली होती. याला प्रत्युत्तर म्हणून रशियाने अमेरिकेनजीकच्या क्युबा या देशात आपली अण्वस्त्रं नेऊन ठेवली. त्याबदल्यात त्याने क्युबाचे अध्यक्ष असलेल्या फिडेल कॅस्ट्रो यांना अत्याधुनिक शस्त्रास्त्रं आणि विमानं द्यायचं, तसंच अमेरिकेच्या विरोधात क्युबाच्या बाजूने उभं राहण्याचं आमिष दाखवलं. कॅस्ट्रो यांना सौदा पटला. असाही क्युबा साम्यवादाच्या उंबरठ्यावर होता, त्यात रशिया आपल्या पाठीशी इतका भक्कम उभा राहतोय म्हटल्यावर तर कॅस्ट्रोचा आत्मविश्वास चांगलाच वाढला. या सौद्यानुसार रशियाला क्युबाची जमीन वापरायला मिळून त्या आधारे अमेरिकेवर वचक ठेवता येणार होता. त्याप्रमाणे सर्व गुप्त हालचाली सुरू झाल्या. पण अमेरिकेला याची खबर लागली. आता यावर काहीतरी तर करावं लागणारच होतं, नाहीतर फार मोठा अनर्थ घडला असता. तेव्हा सगळ्या बाजूंनी सखोल विचार करून केनेडी यांनी संयमाने आणि चातुर्याने ही परिस्थिती हाताळली. केनेडी आणि रशियाचे अध्यक्ष निकिता ख्रुश्चेव्ह यांच्यात युद्धपूर्व वाटाघाटी सुरू झाल्या आणि खंबीर भूमिका घेऊन त्यांनी रशियाला क्यूबामधून क्षेपणास्त्रं मागे घ्यायला भाग पाडलं. जगावरचं तिसऱ्या महायुद्धाचं संकट टळलं.
 

याशिवाय केनेडी यांच्या खात्यात काही उल्लेखनीय गोष्टी जमा आहेत. अमेरिकेतली सामाजिक आणि आर्थिक विषमता दूर करण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. या काळामध्ये त्यांच्या प्राधान्यक्रमामध्ये दोन महत्त्वाची कामं होती : आयकरात कपात करणं आणि नागरी हक्क विधेयक मांडणं. आर्थिकदृष्ट्या मागास क्षेत्राला मदत देण्यासाठी त्यांनी तसं विधेयकही मंजूर करून घेतलं. पण या सगळ्यात महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठरला, तो म्हणजे चंद्रावर मानवाने पाऊल ठेवणं. अवकाश मोहिमा राबवण्यासाठी केनेडी यांनी प्रोत्साहन दिलं. त्यांच्याच पुढाकाराने अमेरिकेचं पहिलं अंतराळ उड्डाण यशस्वी झालं.

पण या सगळ्या चांगल्या गोष्टींचा प्रणेता अल्पायुषी ठरला. २२ नोव्हेंबर १९६३ या दिवशी केनेडी आपली पत्नी आणि टेक्ससचे गव्हर्नर कॉनली यांच्यासह डॅलस येथे मतदानाच्या प्रचारासाठी आले होते. त्यावेळी टेक्सस स्कूल बुक डिपॉझिटरीपाशी या लायब्ररीपाशी त्यांच्या गाड्यांचा ताफा येऊन पोहोचला आणि गोळीबाराच्या आवाजाने आसमंत दणाणून गेला. तेथे उपस्थित जमावाने तीन गोळ्यांचा आवाज ऐकला. केनेडींवर झाडलेल्या गोळ्यांनी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर गोळ्या झाडल्याच्या आरोपाखाली ओस्वाल्ड नावाच्या व्यक्तीला डॅलस पोलिसांनी अटक केली आणि दोनच दिवसांनी डॅलस पोलीस त्याला जेलमध्ये घेऊन जात असताना, जॅक रुबी नामक नाईटक्लब मालकाने गोळ्या झाडून त्याला ठार केलं.

हे नाट्य घडलं यात टेक्सास स्कूल बुक डिपॉझिटरी या लायब्ररीच्या सहाव्या मजल्याचं रहस्य कायम आहे. पोलिसांना घटनेनंतर या सहाव्या मजल्याच्या खिडकीजवळ काडतुसांची आवरणं सापडली. ओस्वाल्डची रायफलही याच मजल्यावर मिळाली. ओस्वाल्डला या घटनेआधी सहाव्या मजल्यावर काहीजणांनी पाहिलं होतं, तसं सांगणारे साक्षीदार पुढे आले. पण एवढंच. ठोस पुरावे असे मिळालेच नाहीत. सहाव्या मजल्यावर नक्की काय घडलं हे गूढ अजूनही पूर्णपणे उकललेलं नाही.

केनेडी तर गेले, पण त्यांची पत्नी जॅकी केनेडी हिने त्यावेळी घातलेला आणि जॉनच्या रक्ताचे डाग पडलेला आपला गुलाबी सूट काढून ठेवायचं नाकारलं. "जॅकला(जॉनला) त्यांनी काय केलंय हे त्यांना बघू देत'' असे तिचे त्यावेळचे शब्द होते. जॉनच्या दफनाआधी तिने आपल्या बोटातली अंगठी काढून त्याच्या बोटात घातली. तो रक्ताचे शिंतोडे उडालेला गुलाबी सूट आज अमेरिकेच्या नॅशनल अर्काइव्हज म्युझियममध्ये आहे. तो तिथे असला तरी केनेडींच्या मुलीच्या इच्छेवरून लोकांना पाहण्यासाठी मात्र तो उपलब्ध नाहीय.

संपूर्ण जगावर या खुनामुळे एक अनामिक दहशत निर्माण झाली, आणि आजतागायत त्यामागचं गूढ पूर्णतः उकललेलं नाही. स्वतः ओस्वाल्डने खुनाचा आरोप फेटाळला होता. त्यानंतर तोच मरण पावल्याने सत्य बाहेर आलं नाही. अनेकांच्या मते हा फार मोठा कट होता, ओस्वाल्ड हा तर फक्त बळीचा बकरा होता. या हत्याकांडामागे सीआयए या अमेरिकी सुरक्षा एजन्सीचा हात आहे असा काहींचा कयास आहे, तर काहीजणांच्या मते रशियाची गुप्तचर संघटना केजीबी याला जबाबदार आहे. काहीही असो, अमेरिकेसारख्या देशाला पन्नास वर्षं होऊन गेल्यावरही या प्रकरणाचा तपास करता आलेला नाही एवढं नक्की.

आजही हे अमेरिकेच्या इतिहासात सगळ्यात गाजलेलं हत्याकांड म्हणून प्रसिद्ध(!) आहे.

स्मिता जोगळेकर