आजकाल आपल्याकडे केबलमुळे चॅनेल्सचा सुकाळ तर झालाच आहे, पण यूट्यूब आणि इंटरनेटमुळे एखादं गाणं किंवा सिनेमा पाहाण्यासाठी टीव्हीवर अवलंबून राहावं लागत नाही. पण दूरदर्शनच्या जमान्यात तर चित्रहार, छायागीत आणि चित्रगीतमध्ये कोणती गाणी लागतील याचेही अंदाज करता यायचे. कधीकाळी जाहिरातींसह खच्चून अर्धातास चालणार्या कार्यक्रमात लागणारे चार-पाच गाण्यांचे व्हिडिओज पाहायला एवढी मरमर करायचो हे आठवून आता हसायला येतं. पण राष्ट्रीय सणांच्या दिवशीचा ससेमिरा अजून सुटला नाहीय. तेव्हाही आणि आताही यातले कुठले ना कुठले पिक्चर लागतातच.
अगदी सक्कासक्काळीच हकीकत्मधलं ’कर चले हम फिदा जान-ओ-तन साथियों’ कानावर पडे आणि त्या आठवड्यातल्या शनिवारी किंवा रविवारी तो चित्रपट हमखास पाहायला मिळे. झालंच तर ’आओ बच्चों तुम्हें दिखायें झॉंकी हिदुस्तानकी’ हे गाणं आणि सोबत ’जागृती’, ’वंदे मातरम’ हे गाणं असलेलाआनंदमठ हे सिनेमे तर पक्के ठरलेले असत. जर हे सिनेमे नसतील तर आपला ’भारतकुमार’ मनोज कुमारकडे अशा दिवशी दाखवण्यासाठीच्या सिनेमांची यादीच तयार होती. उपकार आणि क्रांती तर एकेकाळी दूरदर्शनचे ऑल टाईम फेव्हरिट होते.
ही झाली ९०च्या दशकातली गोष्ट. आज पाहूयात सध्याच्या युगात टीव्हीवर कोणते सिनेमे लागतात ते..








