१५ ऑगस्ट २०१६ .आपला सत्तरावा स्वातंत्र्य दिन. लाल किल्ल्यावरचे भाषण संपत येता-येता आठवण येते " मिले सूर मेरा तुम्हारा " ची. १५ ऑगस्ट १९८८ च्या लाल किल्ल्यावरच्या ध्वजारोहणानंतर राष्ट्रीय एकात्मता संदेश देणारं हे गीत ज्यांनी-ज्यांनी ऐकलं त्यांच्या मनात "मिले सूर.."ची धून आजही रेंगाळते आहे. बर्याच लोकांनी " मिले सूर मेरा तुम्हारा"ला जवळजवळ राष्ट्रगीताचा दर्जा दिला आहे. १९८८ साली दूरदर्शनवरून प्रसारीत झालेल्या या गाण्याचे संगीतकार होते अशोक पत्की आणि त्यांचे सहायक (अॅरेंजर) होते लुईस बँक.
लोकसेवा संचार परिषदेच्या मूळ संकल्पनेला मूर्त स्वरुप ओ अँड एम (Ogilvy & Mather) या जाहिरात कंपनीच्या सुरेश मलिक आणि त्यांच्या सहकार्यांनी दिले. राष्ट्रीय एकात्मतेची ही संकल्पना गेय स्वरुपात आणण्यासाठी पियूष पांडेनी अथक प्रयत्न केले आणि अठराव्या प्रयत्नात ही रचना जन्माला आली. लता मंगेशकर, पंडित भीमसेन जोशी आणि बालमुरली यांच्यासह तीस दिग्गजांचे वेगवेगळ्या वीस ठिकाणी जाऊन चित्रिकरण करणं हे सोपं काम नव्हतं. हे आव्हान फिल्म युनिटनं पूर्ण केलं आणि एक अमर कलाकृती जन्माला आली.
यानंतर २२ वर्षांनी स्वातंत्र्यदिनाच्या हीरक महोत्सवा निमित्त " फिर मिले सूर मेरा तुम्हारा"ची निर्मिती करण्यात आली. मूळ कलाकृतीपेक्षा ही नव्या कलाकृतीचा पल्ला फार मोठा होता. भारतातील साठ दिग्गजांचा सहभाग असलेल्या या चित्रफितीसाठी पूर्ण एक वर्ष लागलं. पंधरा शहरात साठ दिवसांचे चित्रिकरण, एक महिना पोस्ट प्रॉडक्शन एडिटिंग,बावीस सुपरस्टार्स ,तेरा कलाकार आणि गायक, अठरा म्युझिशिअन्स, आणि इतर पंधरा जानेमाने चेहरे एकत्र आणून या "फिर मिले सूर मेरा तुम्हारा" ची निर्मिती झाली. गंमत म्हणजे या दोन्ही फिल्मसमध्ये फक्त अमिताभ बच्चनच कॉमन आहेत, बाकी दोन्हीमधले कलाकार पूर्णतः वेगळे आहेत.
’मिले सूर मेरा तुम्हारा’ जर अस्सल पैठणी असेल, तर ’फिर मिले....’ला पॉलिएस्टरची साडी म्हणायला हरकत नाही. आधीच्या एकसंध गाण्याच्या तुलनेत गाण्यांचे वेगवेगळे तुकडे आपल्या माथी मारण्यात आले. त्यातही जुन्या चाली बदलून नवीन आणि पटकन तोंडी न बसणार्या चाली वापरल्या गेल्या आहेत. पुलंच्या भाषेत म्हणायचंच तर, “अधिकार नसताना उंटाच्या बुडख्याचा मुका” घेण्याचा प्रकार आहे. बॉलिवूडमधल्या सगळे नटवे आणि सांगितिक कलाकारांवरती सगळं गाणं शूट करून शेवटच्या मिनिटाभरात दोन-चार खेळाडू दाखवले आहेत. या सगळ्या गोष्टींमुळे या गाण्यानं माती खाल्ली. अगदी ए. आर. एहमान आणि बच्चनची जादूही या गाण्याला वाचवू शकली नाही.
काही असो, ओरिजिनल ’मिले सूर मेरा तुम्हारा’ची जादू अजून आहे. आजही कुठं ग्रुपमध्ये एकानं जरी हे गाणं गायला सुरूवात केली तरी लगेच सगळे साथ द्यायला लागतात, इतर भाषांतल्या शब्दांची मोडतोडरत अगदी बिंधास्त!! हे "मिले सूर मेरा तुम्हारा"चं आणि त्यांच्या पूर्ण टीमचं यश आहे..
