जगभरात कोरोनाचे थैमान कमी झाल्याने आता पर्यटन पुन्हा सुरू झाले आहे. अनेकजण दोन वर्षे कुठेही गेले नव्हते ते आता काही दिवस तरी पर्यटन करण्यासाठी उत्सुक आहेत. जगभर थैमान घातलेल्या या विषाणूने काही मोजक्या ठिकाणी शिरकाव केलेला नाही. युकेमधल्या दोन बेटांवर कोविड पोहोचला नव्हता. ती बेटे आता पर्यटनासाठी खुली होत आहेत. पर्यटकांना इथे जातात येणार आहे व सुटीचा आनंद लुटता येणार आहे. निसर्गाची उधळण असलेली ही बेटे कोणती आहेत? असा प्रश्न तर पडलाच असेल..
पहिल्या बेटाचे नाव आहे सेंट हेलेना. इथे कोरोनाव्हायरसचे एकही प्रकरण नोंदवले गेले नाही. आफ्रिकेतल्या अंगोलाच्या पश्चिमेला सुमारे १२०० मैल आणि दक्षिण अमेरिकेतल्या ब्राझीलच्या पूर्वेला २५०० मैल अंतरावर सेंट हेलेना बेट वसलेले आहे. येथील लोकसंख्या सुमारे ४,५०० लोकांची आहे. सेंट हेलेना बेट ब्रिटीश ओव्हरसीज टेरिटरी ऑफ सेंट हेलेना, एसेन्शन आणि ट्रिस्टन दा कुन्हाचा भाग आहे. २०१६ मध्ये या बेटावर विमानतळ होण्यापूर्वी बेटावर जाण्याचा एकमेव मार्ग समुद्रमार्गे होता. नंतर विमानतळ झाल्यावरही धावपट्टीच्या मार्गावर जास्त वाऱ्यांमुळे ते सुरक्षित आहे की नाही याची वारंवार चाचणी घेण्यात आली. त्यासाठी बराच खर्च यूके सरकारला करावा लागला. अखेर अनेक चाचणी उड्डाणांनंतर विमानतळ वापरण्यासाठी सुरक्षित म्हणून पास करण्यात आले. आणि ऑक्टोबर २०१७ पासून इथे व्यावसायिक उड्डाणे सुरू झाली.



