घाबरू नका, एकाही सिनेमात सुबोध भावे मुख्य भूमिका करत नाहीय..
बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिक सिनेमांची चलती आहे. गेल्या काही वर्षात विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींच्या आयुष्यावर बायोपिक तयार झाल्या आहेत. यात मात्र खेळाडूंचे नाव टॉपवर घ्यावे लागेल. मिल्खा सिंग, धोनी, सचिन, मोहम्मद अझरुद्दीन, मेरी कोम अशा खेळाडूंवर सिनेमे आले आणि ते तुफान चालले. भारतातील खेळाडूंबद्दल असलेले आकर्षण आणि कुतूहल यामुळे हे सिनेमे चांगले चालतात हे सूत्र निर्मात्यांना सापडले आहे. म्हणून अजूनही ही यादी लांबू शकते. या यादीत भर घालणारे अजून काही सिनेमे येत्या काही काळात येणार आहेत. त्यात कोणत्या खेळाडूवर कुठला सिनेमा येत आहे यावर एक नजर फिरवूया.
१) चकडा एक्सप्रेस
झुलन गोस्वामी ही खेळाडू आपल्या बॉलिंगने विरोधी संघातील खेळाडूंना नामोहरम करत आली आहे. भारताचा महिला क्रिकेटमध्ये असणाऱ्या दबदब्याचे मोठे श्रेय झुलनकडे जाते. झुलनच्या नावावर देशासाठी जगात सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम आहे. तिच्या याच सर्व प्रवासावर आधारित सिनेमा चकडा एक्सप्रेस लवकरच येऊ घातला आहे.






