दूरच जायचं असतं तर लोकं जवळ तरी का येतात? किंवा ब्लॉक करून नाती तुटत नाहीत, फक्त प्रोफाईल दिसत नाही, अशा प्रकारचं स्टेटस अनेकदा ब्रेकअप झालेल्या लोकांच्या व्हाट्सअप स्टेटसवर बघायला मिळतं. अजून काही वर्षांनी आपल्याकडील विवाहसंस्था नष्ट होईल असं मॅरेज ब्युरो क्षेत्रातले जाणकार म्हणतात आणि याच्या मुळाशी आहे ब्रेकअप. ज्यांचं झालं आहे त्यांच्यासाठी काळीज चिरणारा शब्द.
'I am going through a break up' हे सध्या कायम हवेत तरंगत असलेलं वाक्य आहे. पण ब्रेकअप का होतो? काय कारणे असतात? ब्रेकअपनंअतर पॅचअप होते का? व्यक्तिस्वातंत्र्याला मिळालेलं वाढतं महत्व ब्रेकअपचं कारण आहे का? हेच पाहूयात आजच्या लेखात..
आजकाल ब्रेकअप होण्यासाठी क्षुल्लक निमित्तही पुरतं. पण वरवर दिसायला क्षुल्लक दिसणारं निमित्त हिमनगाच्या टोकासारखं असतं. त्याच्याखाली अनेक कारणांचा मोठा भाग असतो. मुख्यतः ब्रेकअप होण्याची खालील कारणं आहेत.
१. हम करे सो कायदा (स्वतःच्या म्हणण्याप्रमाणे दुसऱ्याला वाकायला लावणं)
लहानपणी मुलांचा खोडकरपणा, हट्टीपणा, प्रसंगी हवं ते मिळवण्यासाठी आदळ आपट करणं या गोष्टींकडे लहान म्हणून दुर्लक्ष केलं जातं. पुढे वय वाढल्यानंतर, बऱ्या वाईटाची समज आल्यानंतर मात्र या सगळ्या गोष्टींकडे एका वेगळ्याच नजरेने बघितलं जातं. खास करून ज्या वेळी त्या व्यक्तीवर कुटुंबाची जबाबदारी असते त्यावेळी तर या गोष्टींना अजिबात थारा नसतो. हट्टीपणा, हेकटपणा, समोरच्याचं ऐकून न घेणं यातून पुढे भांडणं, वाद वाढत जातात. त्या पराकोटीला पोहोचल्या तर समोरच्या व्यक्तीच्या सहनशीलतेचा अंत होऊन ब्रेकअप होण्याची शक्यता बळावते.




