हजारो पक्ष्यांना सुरक्षित आणि हक्काची घरटी बनवून देणारे नेस्टमॅन राकेश खत्री!!

लिस्टिकल
हजारो पक्ष्यांना सुरक्षित आणि हक्काची घरटी बनवून देणारे नेस्टमॅन राकेश खत्री!!

काडी काडी जमवून बांधलेली पक्षांची घरटी किती सुंदर असतात ना? अशी घरटी झाडावर पाहिली की त्यांना हात लावण्याचा मोह अनावर होतो. अशी सुंदर घरटी आपणही बनवू शकू असा विचार तुम्ही कधी केलाय का? पक्ष्यांची घरटी विनण्याचं कसब वादातीत असतं. त्यांच्यासारखी घरटी आपण कशी बनवू शकू? असा प्रश्न पडणं साहजिक आहे. पण दिल्लीतील एका माणसाने हे कसब स्वतः शिकून पक्ष्यांसाठी अडीच लाखांहून अधिक घरटी बांधली आहेत. यासाठी त्यांना राष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

पक्षांसाठी स्वतःहून घरटी बनवणाऱ्या दिल्लीतील या व्यक्तीचं नाव आहे राकेश खत्री. ज्यांना ‘नेस्ट मॅन’ म्हणूनही ओळखलं जातं. ही अनोखी कला त्यांनी स्वतःपुरती मर्यादित ठेवलेली नाही तर आपल्या सारखेच हजारो विद्यार्थीही घडवले आहेत.

पक्षी स्वतःची घरटी स्वतः बांधतात आणि मगच त्यात वास्तव्य करतात. मग माणसांनी बनवलेली ही कृत्रिम घरटी त्यांना आवडत असतील का? असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. सुरूवातीला राकेश जेव्हा हा उद्योग करत तेव्हा लोकांनी त्यांची खूप थट्टा केली. पण हळूहळू त्यांनी बनवलेल्या या घरात जेव्हा पक्षी प्रवेश करू लागले तेव्हा मात्र सगळ्यांची तोंडंच्आपोआप बंद झाली.

राकेश खत्रींना लहानपणापासूनच पक्ष्यांविषयी ओढ आणि आकर्षण होते. आत्ताच्या काळात प्रदूषण आणि हवामान बदलामुळे पक्ष्यांच्या आयुर्मानावर आणि एकूणच जगण्यावर विपरीत परिणाम होतो आहे. पक्षी हा आपल्या पर्यावरणाचा एक सुंदर आणि महत्वाचा घटक आहे. प्रचंड वृक्षतोडीमुळे पक्ष्यांना घरटी बांधण्याचीही पंचाईत होत आहे.

“एखाद्याला त्याचं हक्काचं घर बनवून देण्यात मदत करण्यात जो आनंद आहे, तो इतर कशातूनही मिळू शकत नाही. म्हणूनच मी पक्ष्यांना त्यांचं हक्काचं घर मिळावं यासाठी प्रयत्न करतो. विशेष म्हणजे मी बनवलेली ही घरटी आता पक्ष्यांनाही आवडू लागली आहेत आणि त्यात ती सुखाने नांदत आहेत, हे पाहून मनाला खूप समाधान वाटते,” असे राकेश म्हणतात.

सुरुवातीला राकेश यांनी नारळाच्या कवटीपासून पक्ष्यांसाठी घर बनवण्याचा प्रयत्न केला होता. पण तो अपयशी ठरला. नंतर पक्ष्यांसाठी आरामदायक घरटी बांधण्यासाठी काय करता येईल याबाबत त्यांनी विविध प्रयोग केले. बांबूच्या काड्या, ज्यूटचे धागे आणि विविध प्रकारच्या धान्याचा कोंडा असे घटक वापरून त्यांनी घरटी बनवली जी पक्ष्यांसाठी जास्त फायदेशीर ठरत असल्याचे दिसून आले.

सुरुवातीला त्यांनी बनवलेल्या घरट्यात पक्षी येत नसत. पण हळूहळू पक्ष्यांनी या घरट्यांत यायला सुरुवात केली. त्यांच्या अशोक विहार परिसरात त्यांनी याप्रकारची वीसेक घरटी बसवली.

राकेश खत्री यांनी संपूर्ण भारतात आतापर्यंत एक लाख पंचवीस हजार घरटी बनवून बसवली आहेत. यासाठी त्यांना लिम्का बुक ऑफ रेकॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. लाखो विद्यार्थ्यांना ही घरटी बनवण्याचे प्रशिक्षण दिले आहे अजूनही देत आहेत. कोरोनाच्या काळात त्यांनी ऑनलाईन वेबिनारमधूनही प्रशिक्षण देण्याचे काम सुरूच ठेवले.

२०१९ साली चिमण्यांचे संवर्धन आणि संरक्षणाचे काम केल्याबद्दल हाऊस ऑफ कॉमन्स लंडनच्या वतीने त्यांना यासाठी ग्रीन ॲपल अवॉर्ड मिळाला आहे. आयसीएससीच्या अभ्यासक्रमात ४थीच्या पुस्तकात राकेश यांच्या कार्याची माहिती देणारा पाठ समाविष्ट करण्यात आला आहे. त्यांच्या या विषयावरील थिएटर प्रयोगासाठीही राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

यांच्या या अनोख्या उपक्रमामुळे आजर्यंत हजारो पक्ष्यांना सुरक्षित आणि हक्काचे घर मिळाले.

मेघश्री श्रेष्ठी