क्रिकेट म्हटले म्हणजे जेवढे जास्त चौकार षटकार तेवढे जास्त एखाद्या खेळाडूचे कौतुक होत असते. कमी चेंडूत जास्त धावा हव्या असतील तर चौकार षटकार जास्तीत जास्त मारण्याचा प्रयत्न करत असतो. या चौकार षटकारांसाठी कुणालाही कौतुकच मिळत असते. पण एकदा याच चौकार षटकार मारण्यासाठी भारताचा कधीकाळचा धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवाग याला चक्क क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरकडुन बोलणे ऐकावे लागले होते. शांत स्वभावाचा समजल्या जाणाऱ्या सचिनने थेट सेहवागला बॅटने मारण्याची धमकी दिली होती.
आपल्या मोठमोठ्या खेळीसाठी ओळखला जाणारा सेहवाग स्वभावाने देखील दिलखुलास आहे. एका बांगला शोमध्ये त्याने वरील किस्सा सांगितला होता. या शोमध्ये भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीकडे अँकरिंगची सूत्रे होती. सेहवागच्या सोबत व्हिव्हिएस लक्ष्मण, झहीर खान, हरभजन सिंग, रवीचंद्रन अश्विन हे भारताचे महत्वाचे आजी माजी खेळाडू उपस्थित होते.







