चीनमध्ये पुन्हा एकदा कोव्हीडचा संचार सुरु झाल्याच्या बातम्यांनी गेल्या चार दिवसात जगाच्या इतर भागात आणि अर्थातच भारतात भीतीचा संचार झाला आहे. ही भीती केवळ मानसिक आहे की आपण खरोखर सतर्क व्हायला हवे आहे हे समजून घेणे हा या लेखाचा उद्देश आहे.
हा नवा विषाणूचा प्रकार काय आहे ?
गेल्या वर्षी ओमायक्रॉन या कोव्हीडच्या विषाणूचा अवतार तुम्हाला आठवत असेलच. त्याच ओमायक्रॉनची सुधारित नवी आवृत्ती म्हणजे हा नवा विषाणू आहे. अशा विषाणूंना सब व्हेरिअंट अशी संज्ञा आहे.म्हणजेच मुळ जातकुळी कोव्हीडचीच पण नवा अवतार म्हणजे पोटजात असे म्हणायला हरकत नाही.प्र्त्येक जिवंत पेशीत म्युटेशन म्हणजे उत्परिवर्तन होत असते. हा निसर्गक्रम आहे. हे उत्परिवर्तन वेगाने होत असेल तर काळजी करण्याची गरज असते.हे उत्परिवर्तन थांबवणे पूर्णतःआपल्या हातात नसते.त्या उत्परिवर्तीत विषाणूचे गुणधर्म अभ्यासून नेमकी काळजी घेणे हेच श्रेयस्कर असते.
