यंदाच्या, म्हणजेच २०२२च्या ऑस्कर सोहळ्यातला सर्वाधिक रंगतदार क्षण कोणता? विल स्मिथ याला 'किंग रिचर्ड'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला तो? नाही. तुम्ही हा सोहळा पाहिला असेल, तर काहीही विचार न करता तुमचं उत्तर तयार असेल - ज्या क्षणी विल स्मिथने सूत्रसंचालक ख्रिस रॉक याच्या श्रीमुखात भडकावली तो क्षण!! आणि हो, हा प्रसंग सोहळ्याची रंजकता वाढवण्यासाठी निर्मिलेला खोटाखोटा प्रसंग नव्हता, तर ती थप्पड आणि त्यामागचा संताप अगदी वास्तव होतं. आणि (कदाचित) म्हणूनच हा प्रसंग जास्त नाट्यमय वाटला.
ख्रिस रॉकने मार खायला त्याचा आगाऊपणाच कारणीभूत ठरला. विल स्मिथची पत्नी जेडा पिंकेट स्मिथ हिच्या केस गळण्यावरून क्रिस रॉक याने ऑस्करसारख्या जागतिक पातळीवरच्या जाहीर समारंभात टीकाटिप्पणी केली. स्मिथचं पित्त खवळलं ते यामुळेच.
जेडा पिंकेट पन्नास वर्षाची आहे आणि गेल्या काही काळापासून ती ॲलोपेशिया या विकाराने त्रस्त आहे. सामान्यांना समजेल अशा भाषेत बोलायचं तर ॲलोपेशिया म्हणजे एक प्रकारचं टक्कल. मराठीमध्ये याला चाई पडणं असं म्हणतात. यामध्ये शरीरात दीर्घकाळ दाह होऊन त्याचा केशमुळांवर परिणाम होतो आणि केस गळायला लागतात. यामध्ये कधीकधी ठराविक भागातले सर्व केस गळून जातात आणि त्या ठिकाणी छोटे गोलाकार पॅचेस तयार होतात. याला ॲलोपेशिया ॲरियाटा असं म्हणतात. २० ते ४० वयोगटाच्या तरुणांमध्ये हा विकार जास्त करून आढळून येतो. कधी कधी संपूर्ण टाळूवरचे केस गळतात. याला ॲलोपेशिया टोटॅलिस असं नाव आहे.

