रोज 'थोडी' किंवा नुसती बीअर घेतल्याने काही होत नाही? संशोधन काय म्हणते ते वाचलेत का?

रोज 'थोडी' किंवा नुसती बीअर घेतल्याने काही होत नाही? संशोधन काय म्हणते ते वाचलेत का?

दारूमुळे नुकसान होते हे अनेकांना मान्य असते. दारूच्या मानाने बीअर तशी कमी नुकसान करते असे अनेकांना वाटते. मग एका बीअरने काही होत नाही म्हणून एका बीअरपेक्षा जास्त पिणारेही बरेच असतात. पण बीअरने नुकसान होत नाही असे समजणारे पुरेसा अभ्यास करत नाहीत असेच म्हणावे लागेल.

दारूचा थेट परिणाम माणसाच्या मेंदूवर होत असतो. पण नुकत्याच समोर आलेल्या एका संशोधनानुसार रोज दोन बीअर पिणे हे देखील मेंदूसाठी घातक असते. या संशोधनासाठी ३६,००० हजार लोकांच्या मेंदूचा एमआरआयचा अभ्यास करण्यात आला. हे संशोधन वाचल्यावर लोकांना मेंदू आणि दारू याबद्दल मोजकीच माहिती असते हे कळून येईल.

काही लोकांना वाटतं की रोज मोजक्या प्रमाणात अल्कोहोल शरीरात गेले तर काही आरोग्याचे प्रश्न निर्माण होत नाहीत. त्यांचा मात्र आता गैरसमज दूर होऊ शकतो. कारण या संशोधनात अति दारू पिणारे वगळले तरी कमी पिणारेही धोकादायक परिस्थितीत दिसून आले आहेत.

या संशोधनात मध्यम प्रमाणात दारू पिणाऱ्यांचाही अभ्यास करण्यात आला आहे. आता संशोधक वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या प्रमाणात दारू पिल्याचे परिणाम यावर अभ्यास करत आहेत. या संशोधन मोहिमेतले एक संशोधक गिडेन निओ यांच्या म्हणण्यानुसार, "आम्ही मध्यम प्रमाणात दारू पिणाऱ्यांचा अभ्यास केला आहे. पण आम्ही रोज एक बीअर किंवा अधून मधून बीअर पिणे याचा काय परिणाम होतो याचा अभ्यास करणार आहोत".

काहीही असले तरी रोज दारू किंवा बीअर पिणाऱ्यांनी यातून आपल्या मेंदूवर काहीही वाईट परिणाम होत नाही, हा गैरसमज काढून टाकावा. कारण मध्यम अल्कोहोलही शरीराला घातक असते हे वेळोवेळी विविध संशोधकानी सिद्ध केले आहे.

उदय पाटील