कोणावर भार नको म्हणून आनंदाने रिक्षा चालवणारे ७४ वर्षांचे इंग्रजी प्रोफेसर आजोबा!!

कोणावर भार नको म्हणून आनंदाने रिक्षा चालवणारे ७४ वर्षांचे इंग्रजी प्रोफेसर आजोबा!!

वृध्दत्व कोणावर भार होऊन जगायचं का आनंदात मर्जीप्रमाणे जगायचं? असं कोणीही विचारलं तरी जगात प्रत्येकजण हेच म्हणेल की कोणावर भार न होता शेवटच्या क्षणापर्यंत जगता आलं पाहिजे. आज आम्ही अशीच एका रिक्षावाल्या आजोबांची कहाणी सांगणार आहोत. हे आजोबा मुंबईतल्या मोठ्या कॉलेजात इंग्रजीचे एक उत्तम प्राध्यापक होते. ते आता निवृत्तीनंतर म्हणजे गेले १४ वर्ष रिक्षा चालवत आहेत आणि तेही कुठली तक्रार न करता! त्यांची कहाणी अनेकांना सकारात्मकता शिकवेल.

बंगळुरूच्या निकिता अय्यर यांनी आपल्या सोशल मीडियावर हा अनुभव शेअर केला आहे. निकिता या एका संध्याकाळी ऑफिसमधून घरी जात असताना रिक्षाची वाट पाहत होत्या. तितक्यात पटाबी रमण यांनी रिक्षा थांबवली आणि त्यांच्याशी अस्खलित इंग्रजीमध्ये संभाषण केले. निकिता यांना खूप आश्चर्य वाटले. त्यांनी विचारले, "तुम्ही इतके चांगले इंग्रजी बोलता आहात, मग रिक्षा कसे काय चालवता?" ७४ वर्षीय पटाबी रमण यांनी हसत उत्तर दिले, "मी इंग्रजीचा प्राध्यापक होतो. मुंबईत पवई इथल्या मोठ्या कॉलेजमध्ये २० वर्ष नोकरी केली आणि ६० व्या वर्षी निवृत्त झालो. निवृत्तीनंतर गेले १४ वर्ष बंगळुरूमध्ये रिक्षा चालवत आहे."

त्यांनी पुढे सांगितलं, "मी मूळचा कर्नाटकचा. तिथून MA आणि M Ed. ची पदवी घेऊन नोकरीच्या शोधत होतो. पण जातीमुळे कोणीही मला नोकरी दिली नाही. शेवटी मी मुंबईत आलो. इथे नोकरी मिळाली. इथेच संसार केला आणि निवृत्तीनंतर पुन्हा बंगळुरू इथे आलो. खाजगी कॉलेज असल्याने निवृत्तीवेतन मिळत नाही. कॉलेजचा त्याकाळी पगार १०-१५,००० इतकाच होता. मी आणि माझी बायको, जिला मी मैत्रीण मानतो. आम्ही दोघांनी ठरवलं की इथेच फ्लॅट भाड्याने घेऊन राहायचं. मुलांवर भार नको. आता दिवसाला मला ७५०-१००० रुपये इतकी कमाई होते. त्यात आमच्या दोघांची गुजराण होते. माझी पत्नी ७२ वर्षांची आहे. ती घर सांभाळते आणि मी दररोज ९-१० तास रिक्षा चालवतो. माझा मुलगा मला घरभाडे भरायला मदत करतो. मुलं त्यांचा संसार आनंदाने करत आहेत आणि आम्ही आमचा संसार मस्त करत आहोत. मला रिक्षा चालवताना रस्त्याचा राजा आहे असं वाटतं. मला मर्जी वाटेल तेव्हा मी कुठेही रिक्षात फिरू शकतो."

त्यांचा समाधानी चेहरा बरच काही सांगत होता. परिस्थिती कितीही खडतर असो, न रडता हसत जगायचं. असंच जणू ते सांगत होते.

शीतल दरंदळे