जगभरात उफाळलेली गोवराची साथ भारतात आली तर ? काय काळजी घ्याल ?

लिस्टिकल
जगभरात उफाळलेली गोवराची साथ भारतात आली तर ? काय काळजी घ्याल ?

गोवर हा प्रामुख्याने लहानमुलांमध्ये आढळणारा संसर्गजन्य आजार आहे. अमेरिकेने २००० साली अशी घोषणा केली होती की अमेरिका गोवरमुक्त झाला आहे, पण गेल्या काही वर्षापासून गोवर परतलाय असं दिसतंय. यावर्षी अमेरिकेतल्या तब्बल ६८१ लोकांना गोवर झाला आहे.

भारतात गोवर आटोक्यात आणण्यात बऱ्यापैकी यश आलं आहे. याचं कारण म्हणजे गोवरच्या लसीकरणाचं अभियान. २०१० ते २०१३ पर्यंत गोवरच्या लसीकरणासाठी अभियान राबवण्यात आलं होतं. परिणामी ४ वर्षात तब्बल ४१,००० ते ५६,००० बालकांचा जीव वाचला होता.

मंडळी, गोवरची साथ भारतात कमी झाली असली तरी ती नष्ट झालेली नाही. नुकतंच मुंबई मध्ये गोवरचे ४० रुग्ण आढळून आले आहेत. याला एक महत्वाचं कारण आहे. गोवर आणि रुबेला या आजारांवर दिल्या जाणाऱ्या लसीमुळे नपुंसकत्व येतं अशी अफवा पसरली आहे.

गोवर पुन्हा डोकं वर काढत आहे त्यानिमित्ताने गोवर नामक काय आजार आहे आणि त्याला रोखण्यासाठी काय करावं लागेल हे जाणून घेणं महात्वाचं ठरेल.

चला तर आज गोवरविषयी माहिती घेऊया.

गोवर सहसा उन्हाळ्यात पसरतो. हा आजार ओळखायचा झाला तर शरीरावर पुरळ उठलेत की नाही हे सर्वात आधी तपासलं जातं. लहान मुलांना जर ताप आला असेल तर अंगावर पुरळ असल्याची खात्री केली जाते. हे पुरळ देखील वेगवेगळ्या आजारांचे सूचक असू शकतात. जसे की रुबेला, स्कारलेट फीवर, इन्फेक्शन मोनोन्यूक्लिओसीस, डेंग्यू, कावासाकी, हॅण्ड फूट माऊथ डिसीज आणि गोवर.

गोवर कसा पसरतो ?

गोवर कसा पसरतो ?

गोवर झाल्यावर जे पुरळ उठतात त्यांना शास्त्रीय भाषेत ‘एक्झॅन्थम’ म्हणतात. याला कारणीभूत असतो पॅरामिक्झोव्हायरस  नावाचा अति संसर्गजन्य विषाणू. शिंकण्यातून आणि खोकण्यातून गोवर पसरतो. यासाठी एक विशिष्ट कालावधी आहे गोवर झालेला व्यक्तीच्या अंगावर पुरळ उठण्याच्या ३ दिवसाअगोदर आणि पुरळ उठल्यावर ६ दिवसांनी गोवर पसरतो. संसर्ग झाल्याच्या ८ ते १५ दिवसांनी ९५% लोक या आजाराला बळी पडलेले असतात.

लक्षणे :

लक्षणे :

ताप, सर्दी, डोळे लाल होणे, डोळ्यातून पाणी येणे, खोकला अशी सुरुवातीची लक्षणं दिसू लागतात. पुरळ उठायला सुरुवात होते ती कपाळापासून, नंतर ती मान आणि हातापायापर्यंत पसरते. काही दिवसांनी गालाच्या आतल्या बाजूला पण पुरळ दिसून येते. पुरळ सुरुवातीला सपाट तांबड्या रंगाचे असतात. कालांतराने त्यावर उंचावटा दिसू लागतो आणि त्या ठिकाणी खाज सुटते.

गोवर हा एक गंभीर आजार आहे कारण तो इतर आजारांना निमंत्रण देतो. लहान मुलांना खोकल्याचा त्रास सुरु होतो आणि त्यामुळे घशाला सूज होते. गोवर झाल्यावर अ जीवनसत्वाची मात्रा कमी होते. त्यामुळे डोळ्यांचे आजार सुरु होतात. काहीवेळा अंधत्व पण येतं.

उपचार :

उपचार :

गोवरवर खरं तर नेमका उपचार उपलब्ध नाही, पण लसीकरणातून या आजारावर मात करता येते. यासाठी जी MMR लस दिली जाते. ती गोवरच्याच विषाणूपासून बनवलेली असते. गोवरवर मात करण्यासाठी गोवरचे विषाणू ? यापाठी एक हटके विज्ञान आहे.

हे विषाणू जवळजवळ मृत अवस्थेत असतात, शरीरात या विषाणूंच्या प्रवेशानंतर ते पुन्हा कार्यरत होई पर्यंत शरीरात रोगप्रतिकारशक्ती तयार झालेली असते. अशा प्रकारे भविष्यात होणाऱ्या गोवरवर मात करता येते. MMR लस गोवर, गालगुंड आणि रुबेला अशा तीन आजारांसाठी दिली जाते.

MMR लसीकरणाचे २ टप्पे असतात. पहिल्या टप्प्यातील डोस ९ ते १५ महिन्यांच्या बालकांना दिला जातो. दुसऱ्या टप्प्यात १५ महिने ते ६ वर्षापर्यंतच्या बालकांना डोस दिला जातो. या लासिकारणाने जवळजवळ ९७% लोकांना गोवर होत नाही.

याखेरीज लहान मुलांच्या बाबतीत काही ठराविक काळजी घ्यायला हवी. बाळाच्या शरीरात पाण्याचे प्रमाण संतुलित राहायला हवे. कुपोषित बालकांमध्ये गोवरचे प्रमाण सर्वाधिक असते. अशा बालकांची विशेष काळजी घ्यायला हवी. गोवर झाल्यावर अ जीवनसत्वाची कमतरता निर्माण होते. यासाठी अ जीवनसत्वाचा डोस दिल्यास आजार आटोक्यात येतो.

तर मंडळी, गोवर पुन्हा पसरत आहे, पण काळजी घेतल्यास आपण पुन्हा एकदा गोवर नामशेष करू शकतो. एक गैरसमज आताच दूर करा, गोवर फक्त लहानमुलांना होतो असं नाही. गोवर मोठ्यांना पण होऊ शकतो. त्यामुळे आपल्या आजूबाजूच्या लहानग्यांची आणि स्वतःची काळजी घ्या. इतरांना ही बातमी कळवण्यासाठी हा लेख शेअर करायला विसरू नका !!!

टॅग्स:

healthbobhata marathimarathi bobhatabobhata infotainmentbobhata entertainmentmarathi infotainmentinfotainmentbobatabobhata marathi infotainmentinfotainment marathimarathiBobhatabobhata newsmarathi news

संबंधित लेख