या श्लोकाचे आजच्या कोरोना- महामारीच्या पार्श्वभूमीवर मोठे महत्त्व आहे, अर्थातच तंबाखू-प्रेमीं च्या संदर्भात! तंबाखू-प्रेमीं मध्ये गुटखा, चुना-तंबाखू, पान-तंबाखू चघळणारे आले आणि सिगारेट, बिडी, हुक्का ओढणारेही आले. कोरोना विषाणू हा रक्त-संवहनामध्ये विकृती निर्माण करून शरीराला विकृत करतो. त्यामुळे ज्यांच्या रक्त वाहिन्या व रक्त-संचरण मुळातच खराब आहे अशा वृद्ध व्यक्तींमध्ये आणि मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदय विकार आदी आजाराच्या रुग्णांमध्ये (त्या रोगांचा उपचार योग्य झाला नसल्यास) कोरोना संसर्गामुळे धोका बळावतो आणि अगदी तशाच प्रकारे रक्तवाहिन्या खराब होण्याचा व रक्त संवहन बिघडण्याचा धोका संभवतो तंबाखू मुळे. त्यामुळे खरं तर तंबाखू-प्रेमी मंडळीच रेड झोन मध्ये आहेत.
आता हे झाले ज्याचे-त्याचे वैयक्तिक नुकसान.
दुसरीकडे या तंबाखूचा आजच्या कोरोना महामारीच्या परिस्थिती मध्ये संपूर्ण समाजाला धोका संभवतो.
वेगवेगळ्या स्वरूपात तंबाखू चघळणारे दर मिनिटाला इथे-तिथे थुंकत असतात. इथे-तिथे म्हणजे कुठेही! खिडकीतून, बसमधून, ट्रेन मधून, कारमधून, रिक्षातून, बैलगाडीतून, रस्त्यावर, फुटपाथवर, प्लॅटफॉर्म वर, बसस्टॉप वर, चौकात, दुकानात, दुकाना बाहेर, गटारात, नाल्यात, इमारतीच्या कोनाड्यात - जिन्यावर-लिफ्ट मध्ये, इमारती च्या प्रांगणात, चाळीमध्ये, झोपडपट्टी मध्ये, शौचालयात, खेड्यात, गावात, शहरांत ; गल्ली पासुन दिल्ली पर्यंत; यत्र...तत्र...सर्वत्र!