लंडनमधील प्रसिद्ध नैसर्गिक इतिहास संग्रहालयातर्फे दरवर्षी 'वाइल्ड लाइफ फोटोग्राफी स्पर्धा' आयोजित केली जाते. ही एक प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय वन्यजीव छायाचित्रण स्पर्धा आहे. भारतीयांसाठी आनंदाची बातमी म्हणजे या वर्षी ही स्पर्धा १० वर्षांच्या विद्युन हेब्बर या मुलाने जिंकली आहे. त्याने काढलेल्या फोटोला लहान मुलांच्या गटात पहिले पारितोषिक मिळाले आहे. ही जगातील सर्वात जुनी म्हणजे गेल्या 50 वर्षांहून अधिक काळ चालवली जाणारी फोटोग्राफी स्पर्धा आहे. मंगळवारी यातील विजेत्यांची घोषणा केली गेली.
या स्पर्धेसाठी तब्बल ९५ देशांमधून ५०,००० हून अधिक फोटोज् आले होते. भारताचा बंगळुरूमध्ये राहणारा विद्युन हा पाचवी इयत्तेतला विद्यार्थी आहे. यंग वाइल्डलाइफ फोटोग्राफर ऑफ द इयर पुरस्कार जिंकल्यावर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्याने वयाच्या तीन वर्षापासून फोटो काढण्यास सुरुवात केली होती. घरात असताना ही तो अगदी लहान लहान प्राणी, कीटक, पक्ष्यांचे फोटो काढतो.
विद्युनच्या या पहिल्या क्रमांकाच्या फोटोत एक कोळी टुक-टुकमधून जाताना दिसतो. विद्युंनने हा फोटो स्थानिक थीम पार्कमध्ये फिरताना घेतला. तिथे त्याला एका मोकळ्या जागेत एक कोळ्याचे मोठे जाळे दिसले. त्या कोळ्याने डोम आकाराचे जाळे विणले होते जेणेकरून त्यात अडकलेला किडा सुटणार नाही. त्या फोटोत इंद्रधनुष्य रंगांची पार्श्वभूमीही खूप सुंदरपणे टिपली गेली आहे.



