बॉम्ब शोधक सिम्बा श्वानाला शूरवीरासारखा अंतिम निरोप दिला! याचा व्हिडिओही पाहा..

बॉम्ब शोधक सिम्बा श्वानाला शूरवीरासारखा अंतिम निरोप दिला! याचा व्हिडिओही पाहा..

कुत्रा हा माणसाचा जवळचा मित्र असतो याबद्दल कुणालाही शंका नाही. कुत्र्यांनी वेळोवेळी माणसांना केलेली मदत सर्वांनी अनुभवलेली असते. संरक्षण खात्यात असलेले कुत्रे देखील वेळोवेळी आपल्या हुशारीचे आणि प्रामाणिकपणाचे प्रदर्शन करतात.

बॉम्ब शोधण्यात मदत करून अनेक मोठ्या घटना टाळणाऱ्या सिम्बा नावाच्या शूर कुत्र्याचा नुकताच मृत्यू झाला. त्याला निरोप मात्र एका शूरास द्यावा असाच देण्यात आला. जेव्हा कधी कुठे बॉम्ब ठेवला गेलाय अशी माहिती येत असे, तेव्हा धोक्यात जीव कोणाचा असे तर तो सिम्बाचा!!

पण कर्तव्यात कसूर न करता इतकी वर्षे त्याने बॉम्ब शोधण्याचे काम इमानेइतबारे पार पाडले होते. त्याच्या शेवटच्या प्रवासावेळी त्याला तीन फैरींची सलामी देत निरोप देण्यात आला. वेटरनरी हॉस्पिटल मुंबई येथे हा अंतिम समारंभ पार पडला.

 

हा प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर आला आहे .यात पोलीस आपल्या लाडक्या सिम्बाला अलविदा करताना दिसत आहेत. सिम्बासारख्या शूर कुत्र्यांवर सर्वांचा जीव जडलेला असतो. त्यांचे जाणे खरेतर सर्वांना दुःखी करून जाते. त्यात नेहमी त्याच्या सहवासात असणारे पोलीस देखील दुःखी होणे साहजिक आहे.

सिम्बाने आपण एक जिवंत जीव असूनही मशीनपेक्षा प्रभावी काम करु शकतो हे वेळोवेळी बॉम्ब शोधून सिद्ध करून दाखवले होते. याच कारणाने सोशल मीडियावर लोकांकडून सिम्बाच्या कामाचे कौतुक केले जात आहे. तसेच त्याला सर्व स्तरातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

उदय पाटील