अॅसिड अटॅक होऊनही तिने केला अमेरिकेत रॅम्प वॉक! : सलाम रेश्मा कुरेशी!!

अॅसिड अटॅक होऊनही तिने केला अमेरिकेत रॅम्प वॉक! : सलाम रेश्मा कुरेशी!!

 'सुंदरता अंतर्मनाची बघावी.. बाह्य शरीराची नाही'   हे जगाला दाखवून देण्यासाठी जेंव्हा एक अॅसिड हल्ला झेलणारी मुलगी फॅशन रॅम्पवर उतरते.. तेंव्हा अनेकांना गहिवरून येत होतं आणि सोबतच समाजातल्या त्या राक्षसी प्रवृतींनाही योग्य संदेश मिळाला होता. 

बातमी आहे न्यूयॉर्क मधली. एफटीएल मोडाने आयोजित केलेल्या फॅशन वीकमध्ये सहभागी झाली होती भारताची 19 वर्षीय रेश्मा कुरेशी. तिच्यावर तिच्याच नातलगाने अॅसिड फेकून तिचा चेहरा विद्रूप केला होता. डिझायनर अर्चना कोचरने डिझाईन केलेला ड्रेस परिधान करून जेव्हा ती रॅम्पवर उतरली तेव्हा उपस्थित लोकांनी टाळ्यांच्या कडकडाटाने तिला अभिवादन केलं. तिच्या आत्मविश्वासाने तिने लाखो लोकांचे मन जिंकले. कितीतरी कॅमेर्‍यांनी तिच्या स्वाभिमानी छबीला टिपून घेतलं. 

"लोकांनी अॅसिड हल्ल्यातील पिडीतांच्या समस्या समजून घ्यायला हव्यात, त्यांनाली आपलं मानायला हवं. या पीडीतांनी पुढे येऊन साहसाने जगायला हवं, अशा सर्व पिडीतांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी मी हे कार्य करत आहे." असं रेश्मा सांगते. 

खरंच, स्वतःचं दुःख आणि शारीरिक दुर्बेलतेवर मात करून खंबीर मनाने परत एकदा गरूडझेप घेणार्‍या वीर  रेश्माला बोभाटाकडून मानाचा सलाम...!!