साशा छेत्री हे नाव काही महिन्यांपूर्वी एक अनोळखी नाव होतं. डेहराडून मधून आलेली ही मुलगी सेंट झेवीअर्स, मुंबईची विद्यार्थिनी होती. सेंट झेवीअर्समधून शिक्षणक्रम करून बाहेर पडल्यावर काही दिवस जाहिरातींसाठी कॉपी लिहीण्याचे काम ती करत होती. जेव्हा या कामात मन रमेना तेव्हा ती मॉडेलींगकडे वळली आणि एअरटेलच्या फोर-जी या जाहिरातीसाठी तिची निवडही झाली . एअरटेल फोर-जी चॅलेंज या जाहिरातीतून ती घराघरात पोहचली केवळ दोन महिन्यांच्या अवधीत ५४००० पेक्षा जास्तवेळा ही जाहिरात प्रेक्षकांच्या नजरेत आली आणि एअरटेलच्या फोर-जीच्या पेक्षाही जास्त स्पीडने ती सेलेब्रिटी बनली. तिच्या बालीश, निरागस चुणचुणीत अभिनयाने लोकांची मने जिंकल्यावर एअरटेलच्या बाकी सर्व जाहिरातींसाठी तिची निवड कायम करण्यात आली. साशा छेत्री एका महीन्यात स्टार झाली खरी पण त्या जाहिरातीची संकल्पना मात्र चेष्टेचा विषय झाली. सुरुवातीला काही दिवस जाहिरात बघितल्यावर साशाचा उल्लेख "ती फोर-जी वाली आगाऊ मुलगी " असा व्हायला लागला. जाहिरातीतला तोच-तोचपणा ग्राहकांच्या नजरेला खुपायला लागला. आणि ’गूंज इंडीया इंडेक्स २०१५’ या चाचणी मतदानात एअरटेल हा "मोस्ट हेटेड ब्रँड " हे मानांकन मिळाले.
साशा छेत्रीचे तारकापद अजून अढळ आहे पण एअरटेलच्या जाहिरातीची ही खिल्ली बघण्यासारखी आहे.




