लहानपणी जे मित्र आयुष्यात येतात ते सर्वात जास्त जवळचे असतात, मग ते शेजारी राहणारे असोत किंवा शाळेतले. आणखी एक जवळचा दोस्त म्हणजे प्राणी. तुम्ही अनुभवले असेलच, की लहान मुलांची प्राण्यांशी किंवा पक्षांशी किती पटकन मैत्री होते. लहान मुलांचे निरागस मन कदाचित प्राणी मित्रांना वाचता येत असेल. आज आम्ही अश्याच एका गोड मुलीची गोष्ट सांगणार आहोत. ही मुलगी पक्षांची मैत्रीण आहे. ती बागेत पक्ष्यांना खाऊ देते आणि त्या बदल्यात पक्षी तिला भेटवस्तू आणून देतात. हे काल्पनिक कथा नाही, तर खरोखरंच घडले आहे.
सिएटलमधील एका मुलीची ही कथा. तिचं नाव गाबी आहे. २०११ पासून जेव्हा ती फक्त ४ वर्षांची होती तेव्हा पासून तिची आणि कावळ्यांची मैत्री झाली. एकदा ती शाळेत जाताना डब्यातून काही खाद्यपदार्थ खाली पडायचे. आणि तेव्हा कावळे तिच्याभवती जमले. तिला खूप गंमत वाटली. तिने त्यांना अजून खायला दिले. रोजच्या रोज आता कावळे खाण्याच्या आशेने तिच्याभोवती गर्दी करायचे. तिचा भाऊही सोबत असायचा. जशी ती मोठी होऊ लागली तेव्हा ती खास डब्यात खाऊ घेऊन येऊ लागली आणि कावळेही तिची वाट पाहू लागले. त्यांनी कधी तिला त्रास दिला नाही.






