२४ तासांहून अधिक वेळ पाण्याखाली राहू शकणाऱ्या रेड फायर मुंग्या!! किती धोकादायक असू शकतात हे एकदा वाचाच!

लिस्टिकल
२४ तासांहून अधिक वेळ पाण्याखाली राहू शकणाऱ्या रेड फायर मुंग्या!! किती धोकादायक असू शकतात हे एकदा वाचाच!

निसर्गात अनेक किटक, पक्षी, प्राणी समूह करून राहतात. खूप थोडे प्राणी एकटे राहत असतील. तुलनेने लहान किंवा कमी शक्तिशाली प्राणी कळप करून राहतात. पक्ष्यांचे थवे, प्राण्याचे कळप, मधमाश्यांचे पोळे, मुग्यांची वारुळे अशी समूहात राहणारी अनेक नावं सांगता येतील. समूहात राहिल्याने थंडी, पावसापासून संरक्षण होतेच याशिवाय शिकार होण्यापासून वाचता येते. लाल मुंग्यांचेच पाहा! जेव्हा त्यांच्यावर चुकूनही आपला पाय पडला तर त्या एकत्र चावा घेतात आणि स्वतःचे रक्षण करतात. याच लाल मुंग्यांचा एक प्रकार तो म्हणजे रेड फायर मुंग्या. या दक्षिण अमेरिकेत आढळतात. या लाल मुग्यांविषयी (red fire ants) आजच्या लेखात पाहूयात. या जेव्हा पाण्यावर तरंगतात तेव्हा फार अजब प्रकारे एकत्र येतात आणि अमिबासारखा आकारही बदलतात.

रेड फायर मुंगीला असे नाव पडले आहे, कारण या मुंगीचा डंख आपल्या त्वचेवर कोणी जळता निखारा ठेवल्यासारखा जळजळीत असतो. हा दाह खूप त्रासदायक असतो. त्वचा लाल होते आणि सुजते. या लाल मुंगीचे विष आपल्या त्वचेच्या पेशी नष्ट करते. या मुंग्यांचे अस्तित्व दक्षिण अमेरिकेत आढळते, परंतु आता रेड फायर मुंग्या आता अनेक देशांमध्ये पसरल्या आहेत. जगातील डझनभर देशांमध्ये ती वाढत आहे. या मुंग्यांच्या समूहाला कॉलनी म्हणतात. मुंग्याच्या कॉलनीत जवळजवळ ५ लाख मुंग्या एकत्र राहू शकतात. शक्यतो सर्व मुंग्या पाण्यापासून दूर राहतात. पण एका संशोधनात दिसून आले आहे की या मुग्यांकडे एक अनोखी पद्धत आहे जेणेकरून त्या पाण्यावर राहूनही स्वतःचा बचाव करू शकतात.

पाण्याच्या संपर्कात आल्यावर या मुंग्या एकमेकांना चिकटतात. सर्व मुंग्या एकत्र चिकटून एका बोटीसारख्या तरंगायला लागतात. त्यांचे चिकटणे इकडे घट्ट असते की त्या कापल्या तरी त्या एकमेकींपासून सुटत नाहीत. एखादी मुंगी बाहेर पडली तर ती जिवंत राहत नाही. बोटीसारख्या पाण्यावर तरंगताना त्या एकमेकींसोबत पाय जोडतात आणि त्या एकमेकींमध्ये अडकतात. त्यांच्या पायांचा आकार ७-८ इंच इतका असतो. एकमेकांना चिकटल्यामुळे त्या तरंगू लागतात आणि आकारही बदलतात. मुंग्या श्वास घेण्यासाठी फुफ्फुसांचा वापर करत नाहीत. मुंग्यांच्या शरीरातल्या छिद्रांद्वारे त्या ऑक्सिजन शोषून घेतात. पाण्यामध्ये जाण्यापूर्वी मुंग्या ही छिद्रे बंद करतात जेणेकरून पाणी आत जाऊ शकत नाही. असे म्हणतात की २४ तासांपर्यंत या मुंग्या पाण्याखाली जिवंत राहू शकतात. असे तरंगत असताना जेव्हा एखादा कडक पृष्ठभाग किंवा जमीन लागते तेव्हा त्यावर चढून स्वतःचा बचाव करून घेतात.

अमेरिकेत संशोधनाच्या वेळी तज्ञांनी या मुग्या जंगलातून पकडून आणल्या व पाण्याच्या टाकीत टाकल्या. त्या कसा बचाव करतात हे पाहण्यासाठी रात्रीच्या वेळी कॅमेरा सेट करून ते निघून गेले. सकाळच्या वेळी येऊन पाहिले तर एकही मुंगी पाण्यात नव्हती. रेकॉर्डिंगमध्ये पाहिल्यावर दिसले की मुंग्यांच्या कॉलनी एकत्र येऊन अमिबासारखा आकार तयार केला आणि कॅमेराच्या एक बाजूवर त्या चढल्या. हळूहळू त्या स्क्रिनवर आल्या आणि तिथून मार्ग काढून पसार झाल्या. त्यांना टाकीच्या शेजारी असलेल्या भिंतीपेक्षा कॅमेराच्या लेन्सवर चढणे जास्त सुरक्षित वाटले असावे.

या किरकोळ, साध्या मुंग्या काय करणार आहेत? असं तुम्हाला वाटेल. पण या मुंग्यांचा दंश खूप नुकसान करू शकतो. या मुंग्या एकत्र येतात तेव्हा अख्खे शेतही नष्ट करु शकतात. मोठ्या प्राण्यांना गारद करू शकतात. माणसांना केलेला दंशही असह्य असतो. इतर किड्यांपेक्षा Red fire ants जास्त बुद्धिमान आहेत. त्यामुळे पुरासारख्या संकटातून वाचून त्यांनी स्वतःचा बचाव केला आहे. हळूहळू त्या स्वतःचे अस्तित्व वाढवत आहेत. एकत्र आल्यावर त्या एखाद्या स्मार्ट सिस्टिम सारख्या काम करताना दिसतात. विचार करून स्वतःचा बचाव करतात. त्यांच्या जगात अतिक्रमण केल्यास त्या खूप ताकदीने प्रतिकार करू शकतात हे नक्की!

 

लेखिका: शीतल दरंदळे