भारतीयांसाठी अभिमान वाटावा अशी एक महत्वाची बाब नुकतीच घडली आहे. आशिया खंडातील सर्वात मोठा हायस्पीड ट्रॅक भारतात तयार झाला आहे. येणाऱ्या काळात ऑटो क्षेत्रासाठी हे खूप महत्वाचे ठरणार आहे. मध्य प्रदेशच्या इंदूर शहरात आशियातील सर्वात मोठ्या हायस्पीड ट्रॅकचं उद्घाटन मंगळवारी झालं आहे. आणि विशेष म्हणजे हा जगातील पाचवा सर्वात मोठा ट्रॅक ठरला आहे. नॅशनल ऑटोमोटिव्ह टेस्ट ट्रॅक (NATRAX) येथे या सर्वात मोठ्या ट्रॅकचे उद्घाटन झाले आहे. हायस्पीड ट्रॅक म्हणजे काय, यामुळे भारताला काय फायदा होणार आहे, याची माहिती या लेखात करून घेऊयात.
ऑटो सेक्टरसाठी हाय-स्पीड ट्रॅक खूप महत्त्वाचा आहे. या हायस्पीड ट्रॅकमुळे आता देशातील वाहन कंपन्यांना आधुनिक वेगवान वाहनांच्या चाचणीसाठी परदेशात जावे लागणार नाही. तर, इंदूरमध्येच कंपन्यांना आपल्या गाडीची टेस्टिंग घेता येणार आहे. या ट्रॅकचा उपयोग ऑटोमोबाइल कंपन्या ऑटोमोटिव आणि कंपोनेंट टेस्टिंगसाठी करु शकतात. याची लांबी ११.३ किलोमीटर आहे. ट्रॅक जवळपास तीन हजार एकर (२९६० एकर) जमीनीवर उभारण्यात आला आहे. याची रुंदी १६ मीटर आहे आणि दोन अर्धवर्तुळाकार ट्रॅक आहेत.


