ऑलिम्पिकमध्ये गिर्यारोहण स्पर्धा होती? या स्पर्धकांना मरणोत्तर पदके कां देण्यात आली?

लिस्टिकल
ऑलिम्पिकमध्ये गिर्यारोहण स्पर्धा होती? या स्पर्धकांना मरणोत्तर पदके कां देण्यात आली?

ऑलिम्पिक स्पर्धा ही जागतिक स्तरावरील सर्वात मोठी क्रीडास्पर्धा आहे हे तर आपल्या सर्वाना माहीत आहेच. या भव्य स्पर्धेला तितकाच मोठा इतिहासही आहे. ऑलिम्पिक मध्ये खेळल्या जाणाऱ्या सर्व खेळांमध्ये पूर्वी गिर्यारोहण सारखा अत्यंत क्लिष्ट समजला जाणाऱ्या खेळाचाही समावेश होता. यावर्षी टोकियोमध्ये आयोजित ऑलिम्पिक स्पर्धेत पुन्हा एकदा या खेळाचा समावेश करण्यात आला आहे. असे असले तरी जुनी गिर्यारोहण स्पर्धा आणि आताच्या गिर्यारोहण स्पर्धेत बराच फरक आहे. आज आपण गिर्यारोहण स्पर्धेबद्दल नाही तर या स्पर्धेतील एका ऐतिहासिक घटनेवर एक नजर टाकणार आहोत. चला तर पाहूया.

१८९४ पासून ऑलिम्पिकमध्ये गिर्यारोहणाला सुरूवात झाली. या क्रीडाप्रकारातील विजेत्यांना ऑलिम्पिक अल्पाइन प्राईझ नावाने विशेष पुरस्कार दिला जात असे, तर पर्वताचे टोक गाठणाऱ्या खेळाडूला सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात येत असे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला मात्र या खेळाने असे काही विचित्र वळण घेतले की, यातील बहुतांश स्पर्धकांना मरणोपरांत सुवर्ण पदके देऊन सन्मानित करावे लागले. 

१९२२ साली झालेल्या माउंट एव्हरेस्ट चढाई मोहिमेत एकूण १३ स्पर्धकांनी भाग घेतला होता ज्यात १२ खेळाडू ब्रिटीश आणि एक ऑस्ट्रेलियन होता. या सर्वच्या सर्व खेळाडूंना ऑलिम्पिक समितीने पदक देऊन सन्मानित केले. एव्हरेस्टची चढाई करणे म्हणजे काही खायचे काम नाही. तरीही ऑलिम्पिक स्पर्धेचा भाग म्हणून अनेक उत्साही खेळाडूंनी माउंट एव्हरेस्टच्या चढाईसाठी तयारी केली. या उंच पर्वत शिखरावर चढण्याचा हा पहिल्याच प्रयत्न असल्याने संपूर्ण जगाचे लक्ष या चढाईकडे लागून होते. 

स्पर्धकांनी हिरीरीने भाग घेतला पण, गरम जॅकेट, मजबूत दोरखंड, आणि पुरेशी खबरदारी न घेताच केलेली ही मोहीम अतिशय दुर्दैवी ठरली. हिमालयाच्या प्रतिकूल वातावरणात अशा अर्धवट तयारीने गेलेल्या या टीमला तीन वेळा अपयश आले. चौथ्यावेळी ते पुन्हा एकदा न हरता प्रयत्न करू लागले. पण मध्येच हिमस्खलन झाले आणि संपूर्ण टीम यात सापडली. म्हणूनच ऑलिम्पिक समितीने या खेळाडूंना मरणोपरांत सुवर्ण पदक घोषित केले. जनरल चार्ल्स ग्रेनव्हिल ब्रूस, त्यांचे सहाय्यक लेफ्टनंट कर्नल एडवर्ड स्ट्रूट आणि प्रसिद्ध गिर्यारोहक जॉर्ज मॅलोरी यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम आखण्यात आली होती.

एव्हरेस्टवर चढाई करण्यासाठी आलेल्या नवख्या गिर्यारोहाकांना हिमालयातील अवघड वाटांचा अंदाज येत नाही म्हणून त्यांना वाट दाखवण्यासाठी स्थानिक शेरपा मदत करतात. या ऑलिम्पिक सामन्यासाठीच्या गिर्यारोहणावेळीही असे आठ शेरपा या टीम सोबत होते. यातील सात शेरपा भारतीय होते आणि आठवा शेरपा नेपाळी होता. हिमस्खलनाच्या या भीषण प्रसंगातून हे शेरपाही वाचू शकले नव्हते. या सर्व शेरपांनाही मरणोपरांत पदके प्रदान करण्यात आली.  

(मोहिमेचा मार्ग)

चढाई करणाऱ्या गिर्यारोहकांसाठी दोऱ्या बांधून देणे, आवश्यक ते समान घेऊन वर जाणे, अशी सगळी कामे हे शेरपाच करतात. ऑलिम्पिकच्या या टीममध्ये समाविष्ट असणारे, डॉ. आर्थर वेकफिल्ड यांनी घडलेल्या प्रसंगाबद्दल आपल्या पत्नीला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, “मी पुढे गेलो पाठीमागचे साथीदार बराच वेळ झाले तरी आले नाहीत म्हणून मी मागे पहिले तर फक्त बर्फाचे वादळ दिसत होते. मला वाटले आता एखाद्या ठिकाणी बर्फ तुटला असेल आणि हे सगळे त्यात गाडले गेले असतील. हळूहळू वादळ शांत झाले आणि बर्फ खाली बसला तर सगळे सहकारी एखाद्या पुतळ्याप्रमाणे तिथल्या तिथे गोठून गेले होते.”

ऑलिम्पिककडून सर्वच देशाच्या खेळाडूंना सुवर्ण पदक मिळण्याची ही पहिलीच वेळ होती. कारण, एका अत्यंत साहसपूर्ण खेळत सर्वानाच आपला जीव गमवावा लागला होता. विशेष म्हणजे कदाचित आपण परत सुखरूप परत येऊ शकणार नाही, ही शक्यता सर्वांना माहिती असूनही या खेळात भाग घेण्याचे धाडस या खेळाडूंनी करून दाखवले होते. त्यांच्या या धाडसाचे कौतुक करण्यासाठीच त्या सर्वांना मरणोपरांत सुवर्ण पदक देऊन सन्मानित करण्यात आले होते. 

या मोहिमेचे नेतृत्व करणारे सेकंड लेफ्टनंट कर्नल एडवर्ड स्ट्रूट यांनी सर्व सहभागी स्पर्धकांच्या वतीने या पदकांचा स्वीकार केला. दुसऱ्यावेळी हे सुवर्ण पदक घेण्यासाठी एक तरी खेळाडू स्वतःहून पुढे येईल अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली होती, पण त्यांचे हे स्वप्न स्वप्नच राहिले. पुढच्या वेळी म्हणजे १९२४ साली झालेल्या गिर्यारोहण मोहिमेत प्रसिद्ध गिर्यारोहक जॉर्ज मॅलोरी देखील गायब झाला. त्याचा तर मृतदेहही लवकर सापडला नाही. 

शेवटी ऑलिम्पिक संमतीने विचार केला की, आपण अशा प्रकारे मरणोपरांतही जर खेळाडूंना पुरस्कार देत राहिलो तर जीवाची पर्वा न करता आणखी काही खेळाडू यात सहभागी होत राहतील. खरे तर हे प्रोत्साहन खेळासाठी नसून जीवावर उदार होण्यासाठीच आहे, असाही याचा अर्थ होईल की काय असा विचार केला जाऊ लागला. इतक्यात दुसऱ्या विश्वयुद्धाचे वादळ उठले आणि काही काळ ऑलिम्पिकचे भविष्यही झाकोळून गेले. 

१९२२ मध्ये आपला जीव धोक्यात घालणारे ते खेळाडू कधीच विस्मृतीत जाणार नाहीत. स्ट्रूट यांनी सुवर्ण पदकसह शिखर पादाक्रांत करण्याचे स्वप्न पहिले होते ते स्वप्न २०१२ साली गिर्यारोहक केंटोन कुलने पूर्ण केले. केंटोन कुलने तब्बल नऊ वेळा एव्हरेस्टवर चढाई केली आहे. २०१२ मध्ये स्ट्रूट यांना खास श्रद्धांजली वाहण्यासाठी म्हणून तो आपल्यासोबत ऑलिम्पिक पदक घेऊन गेला.

(केंटोन कुलने पूर्ण केलेले स्वप्न)

आता पुन्हा एकदा हा साहसी खेळ ऑलिम्पिकच्या यादीत समाविष्ट होत आहे. यावेळी बरीच खबरदारी घेतली गेली आहे. खेळाची काठीण्य पातळीही कमी केली गेली आहे. आज जे स्पर्धक या साहसी खेळात सहभागी होऊन आपल्या कामगिरीचे प्रदर्शन करणार आहेत त्यांना १९२२च्या या खेळाडूंकडून नक्कीच प्रेरणा मिळेल.

 

लेखिका: मेघश्री श्रेष्ठी

 

आणखी वाचा:

ट्रेकिंगचे किती प्रकार आहेत? ट्रेकिंगची पूर्वतयारी आणि सुरुवात कशी करायची? सोप्या भाषेत समजून घ्या !!

पर्वतरोहणाचे प्रशिक्षण देणाऱ्या प्रमुख संस्था आणि अभ्यासक्रमाचे प्रकार जाणून घ्या !!!