भारतीय नौदलाच्या ६ महिला अधिकारी :  शिडाच्या बोटीतून निघाल्या आहेत पृथ्वी परिक्रमेला!!

भारतीय नौदलाच्या ६ महिला अधिकारी :  शिडाच्या बोटीतून निघाल्या आहेत पृथ्वी परिक्रमेला!!

समुद्रप्रवास म्हटलं की खवळलेला अथांग सागर, उंचच उंच उसळणाऱ्या लाटा, हेलकावे देणारा जोराचा वारा, आणि हिंसक सागरी जीव... सगळं काही डोळ्यासमोर येतं मंडळी... पण या सगळ्याचा धैर्याने सामना करत एका छोट्याश्या शिडाच्या बोटीवर स्वार होऊन आपल्या भारतीय नौदलाच्या ६ महिला अॉफीसर्स निघाल्या आहेत सागरी सफरीवर. फक्त सागरी सफर नव्हे - ही आहे पृथ्वी परिक्रमेची सफर...

या मिशनला नाव दिलं गेलंय नाविका सागर परिक्रमा. INS तारिणी नावाच्या ५५ फुटी छोट्या नावेतून कमांडर वर्तिका जोशी (संघ प्रमुख), लेफ्टनंट कमांडर प्रतिभा जामवाल, पी. स्वाती, लेफ्टनंट एस. विजया देवी, बी. ऐश्वर्या आणि पायल गुप्ता या ६ शूर महिला अधिकारी या सफरीवर रवाना झाल्या आहेत. आशियातील महिलांनी समुद्री मार्गाने पृथ्वी परिक्रमा करण्याचा पहिला प्रयत्न आहे आणि यासाठी गेल्या दोन वर्षांपासून तयारीही सुरू होती. समुद्रमार्गे संपूर्ण पृथ्वी परिक्रमेचा हा प्रवास २१६०० नॉटीकल मैलांचा आहे आणि तो पूर्ण करण्यासाठी ८ महिन्यांचा कालावधी लागेल मंडळी! ही अनोखी सागरी सफर गोवा येथून सुरू होतेय आणि ती गोव्यातच  संपेल. या दरम्यान त्या फ्रीमेंटल (अॉस्ट्रेलीया), लिटलटन (न्युझीलंड), पोर्ट स्टॉन्ले (फॉकलॅन्ड), आणि केप टाऊन या ४ ठिकाणी थांबतील.

स्त्रोत

कमांडर वर्तिका जोशी या टीममधील सर्वात अनुभवी अधिकारी आहेत.  त्यांनी याआधीही अनेक सागरी सफरी यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत. महिला अधिकार्‍यांच्या या पहिल्यावहिल्या जगसफरीसाठी नौदलाकडूनही चांगलीच तयारी करण्यात आलीय. सर्व देशांतील भारतीय दूतावास, तेथील नौसेना व रेस्क्यू झोन्सना या मोहिमेची माहिती देण्यात आलीय आणि सोबत प्रवासादरम्यान नौदलाचं कमांड सेंटर सतत त्यांच्या संपर्कात राहील.

स्त्रोत 

या टीमला तयार करण्याचा मान जातो कमांडर दिलीप ढोंढे यांना. समुद्रमार्गे पहिल्यांदा पृथ्वी परिक्रमा करणारे    हे पहिले भारतीय आहेत. यांनी  कठीणातील कठीण परिस्थितीतही आपली मानसिक खंबिरता कायम ठेवण्याचे धडे त्यांनी आपल्या या टीमला दिले आहेत. या चमूने जेव्हा पंतप्रधान मोदींची भेट घेतली तेव्हा पंतप्रधानांनीही त्यांना शुभेच्छा देऊन भारताची ताकद आणि क्षमता जगाला सांगण्याचा संदेश दिला. 

फक्त वार्‍याच्या भरवरशार, एका लहानशा बोटीतून कोणत्याही हत्यारांशिवाय या वीरांगना अनेक महिन्यांच्या सागरी प्रवासाला रवाना झालेल्या आहेत मंडळी. हे काम वाटतं तितकं सोपं नक्कीच नाही. तेव्हा आपणही त्यांना अॉल द बेस्ट देऊन त्यांच्या यशासाठी भरपूर प्रार्थना करूया...