समुद्रकिनारी सहलीसाठी जायचंय? महासागरातील कचऱ्यापासून बनवलेले कृत्रिम बेट हे तुमचे पुढील डेस्टिनेशन असू शकते..

समुद्रकिनारी सहलीसाठी जायचंय? महासागरातील कचऱ्यापासून बनवलेले कृत्रिम बेट हे तुमचे पुढील डेस्टिनेशन असू शकते..

टाकाऊपासून टिकाऊ बनवणे ही कल्पना काही आपल्याला नवीन नाही. काहीजण कचऱ्यापासूनही काही गोष्टी बनवतात. चिंध्यांपासून गाद्या, पिशव्या हा प्रकार जुना झाला. प्लास्टिक कचऱ्यापासून शूज बनवणाऱ्या एका कंपनीबद्दल (प्लास्टिकच्या थैलीचा कचरा हा या कंपनीचा कच्चा माल आहे- 'थैली'वाले आशय भावे नेमके काय करतात ?) आम्ही यापूर्वी तुम्हांला सांगितलं आहेच. आता पर्यटनासाठी असेच एक खास बेट बांधले जात आहे आणि तेही चक्क समुद्रातील कचऱ्यापासून! याची कल्पना ऑस्ट्रेलियात सर्वप्रथम मांडली गेली आहे. याची तयारीही सुरु झाली आहे. आज पाहूया ही कल्पना नक्की काय आहे?

इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलियाच्या वायव्य किनारपट्टीच्या मध्यभागी कोकोस नावाचे एक बेट आहे. या बेटाजवळच एक कृत्रिम बेट रिसॉर्ट तयार करण्यात येणार आहे. हे बेट पूर्णपणे प्लास्टिकच्या कचऱ्यापासून बनवलेले असणार आहे. हा हिंदी महासागरात जमा होणारा कचरा आहे, तिथून तो गोळा केला जाणार आहे. फक्त प्लास्टिकच नाही, तर समुद्रातून गोळा होणारा सर्व कचरा इथे वापरला जाणार आहे. कोकोस बेटांना प्लास्टिक प्रदूषणाची गंभीर समस्या भेडसावत आहे. २०१९ च्या आकडेवारीनुसार तिथे तब्बल २३८ टन प्लास्टिक सापडले होते. पिशव्यांपासून ,चप्पल, बूट , ते अगदी टूथ ब्रशही समुद्रकिनारी साचले होते. ते पाहून एक ब्रिटिश वास्तुविशारद मार्गोट क्रॅसोजेविक यांनी समुद्रातून गोळा केलेल्या कचऱ्याचा वापर करून एक कृत्रिम बेट तयार करण्याची कल्पना मांडली.

कृत्रिम बेट तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये हा प्लास्टिक कचरा गोळा करून त्याचा पुनर्वापर करून प्रक्रिया केली जाईल आणि नंतर तो बांधकामासाठी वापरला जाईल. त्या बेटावर पूरही येतो. ते पाणी रोखण्यासाठी प्लास्टिकचा कचरा बायोडिग्रेडेबल काँक्रीटच्या जाळीने झाकण्यात येईल. बेटाला पूर येण्यापासून रोखणे असाही या प्रकल्पाचा एक उद्देश आहे. यामुळे गाळ शोषण्यासही मदत होणार आहे. तसेच प्लॅस्टिक कचरा गोळा केल्यामुळे बेटाचा आणखी विस्तार होणार आहे.

यापूर्वी मालदीवमध्येही तरंगते बेट तयार करण्यात आले आहे. हे कोकोस बेटावरचे काम २०२५ मध्ये पूर्ण होईल आणि पर्यटक या बेटाला भेट देऊ शकतील. प्लास्टिक प्रदूषणाचा वाढता प्रश्न मानवजातीला घटक ठरत आहे. असा वापर करून जर एखादी रचना तयार होत असेल तर नक्की पर्यावरणाला थोडाफार हातभार लागणार आहे.

शीतल दरंदळे